हाजुरी परिसराला मिळणार प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी

ठाणे (प्रतिनिधी) :
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने बृहन्मंबई महापालिकेच्या माध्यमातून हाजुरी, लुईसवाडी आणि परिसरात पुरविण्यात येणा-या प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा बंद करून आता प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून येत्या आठवड्याभरात नवीन जलजोडणी करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
गेल्या तीस वर्षांपासून हाजुरी, लुईसवाडी आणि रामचंद्रनगर या परिसराला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनेच्या माध्यमातून सुमारे २२.५० दश लक्ष लिटरप्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या परिसरात गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या स्तरावर गेल्या वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. यासाठी महापालिकेच्यावतीने नवीन जलजोडणी आकार आणि अनामत म्हणून ३ कोटी १६ लक्ष रूपयांची अनामत रक्कमही भरण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुचनेनुसार जलजोडणीच्या ठिकाणी आवश्यक असणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक जलमापक उभारण्याची कार्यवाही अंतीम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसांत या परिसराला प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.