कल्याण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी रघूनाथ गायकर

कल्याण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी रघूनाथ गायकर

टिटवाळा (प्रतिनिधी) : मानिवली गावचे रघूनाथ राजाराम गायकर यांची न्यू  महाराष्ट्र गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या कल्याण तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आपण तालुक्यातील पोलीस पाटलांच्या ज्या अडचणी, प्रश्न आहेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यात पोलीस पाटील हा अंत्यत महत्त्वाचा घटक आहे. गाव पातळीवर तो शासनाने डोळे व कान म्हणून काम करीत असतो.स्वर्गीय गृहमंत्री आर आर पाटील यांनी सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात पोलीस पाटलांचे खूप महत्त्वाचे योगदान होते. या समितीचे ते निमंत्रक म्हणून काम करत होते. राज्यात सध्या २७ हजार ७२० पोलीस पाटील कार्यरत असून सुमारे १२ हजाराच्या आसपास पोलीस पाटलांची पदें रिक्त आहेत.

पोलीस पाटील हे पद महसुल व पोलीस या दोन्ही विभागाशी संबंधित पद असून गावातील कायदा व सुव्यवस्था व  इतर अनेक शासकीय कामामध्ये पोलीस पाटील हे शासनाला मदत करत असतात. अशा न्यू महाराष्ट्र गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या कल्याण तालुका अध्यक्षपदी मानिवली गावचे रघूनाथ राजाराम गायकर यांची नियुक्ती राज्य अध्यक्ष पंढरीनाथ नारायण पाटील यांनी केली आहे.

रघूनाथ गायकर हे उच्च शिक्षित असून शेतकरी देखील आहेत. विविध प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक कार्यात नेहमी यांचा सक्रीय सहभाग असतो. सर्व सामान्य माणसाच्या मदतीला धाऊन जाणारा पोलीस पाटील यांची ओळख असून त्यांची कल्याण तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने तालुक्यातील सर्व गावाच्या पोलीस पाटलांनी समाधान व्यक्त केले आहे. याशिवाय संघटनेचे राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, कल्याण तहसीलदार दिपक आकडे, कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी आदींनी रघूनाथ गायकर यांचे अभिनंदन केले आहे. तर आपण तालुक्यातील पोलीस पाटलांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वरीष्ठांच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष रघूनाथ गायकर यांनी सांगितले.