राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही; संभाजी ब्रिगेडचा पहिला वार

राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही; संभाजी ब्रिगेडचा पहिला वार

ठाणे (अक्षय शिंदे) : राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचे वक्तव्य केले होते. विशेषत: मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तसेच राष्ट्रवादी काँग्रसेच्या उदयानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांचा समाचार घेतला.

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांना आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची आठवण करून दिली त्यात काय चुकीचं केले. यावर मनसेचे पुण्यातील काही कार्यकर्ते विचारांच्या गोष्टी न करता गुंडगिरीच्या गोष्टी करू लागले. कार्यकर्त्यांनी मुद्द्यावर बोलावे व पोकळ धमक्या संभाजी ब्रिगेडला देऊ नये, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश देसाई यांनी मनसेला दिला आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे, हे ध्यानात घ्यावे. गल्लीच्या लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही आणि वेळ पडली तर गल्लीत सुध्दा फिरू देणार नाही, असा टोला संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हाध्यक्ष देसाई यांनी लगावला आहे.