शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंवर रामदास आठवलेंचे शीघ्रकाव्य!

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंवर रामदास आठवलेंचे शीघ्रकाव्य!

कल्याण (प्रतिनिधी) : शीघ्रकवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे नेते रामदास आठवले सध्या भाजप सोबत असले तरी रविवारी त्यांनी कल्याण येथील एका कार्यक्रमात शिवसेनेचे स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर कविता करीत उपस्थित शिवसैनिकांचे मन जिंकले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आठवले यांनी, बाळासाहेब ठाकरे यांनी मला शिवशक्ती व भीमशक्तीची ऑफर देऊ केल्याने आपण समाजातील साहित्यिक, वकील, प्राध्यापक, डॉक्टर, विचारवंत व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच राज्याची  शिव-भीमशक्ती निवडणुकीदरम्यान महायुती केल्याचे सांगितले. 

यावेळी शीघ्रकवी असलेल्या रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर ‘जे उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत खंदे, त्यांचे नाव आहे डॉ. श्रीकांत शिंदे’ असे दोन ओळींचे शीघ्रकाव्य सादर करीत उपस्थित शिवसैनिकांची मन जिंकले. स्वपक्षीय असो वा विरोधी पक्षात कुणावरही शीघ्र काव्य रचणे त्यांना वर्ज्य नाही, हेच आठवलेंनी याप्रसंगी दाखवून दिले.

कल्याणातील सामाजिक कार्यकर्ते तसेच साहित्यिक देवचंद अंबादे यांचा ७५ वा  अमृत महोत्सव वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आठवले  बोलत होते. यावेळी स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, उद्योजिका पद्मश्री कल्पना सरोज, दलितमित्र अण्णासाहेब रोकडे, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, युवक जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे आदी मान्यवरांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकारणात सगळ्यांशी चांगले संबंध ठेवावे लागतात असे सांगून आठवले म्हणाले की, राजकारणात कोणी कधीही एकत्र येऊ शकतो हे सांगता येत नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. पालिका निवडणुकीत भाजपा मनसे युती होणार नसून भाजपा बरोबर आमची युती राहणार असल्याची माहिती आठवले यांनी पत्रकारांना दिली.