रंगीत मासे उबवणी केंद्रामुळे रोजगाराच्या संधीची निर्मिती - सुधीर मुनगंटीवार

रंगीत मासे उबवणी केंद्रामुळे रोजगाराच्या संधीची निर्मिती - सुधीर मुनगंटीवार

ठाणे (प्रतिनिधी) :

नवी मुंबई येथील महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानचे केंद्र हे प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्राचे एक अभ्यासकेंद्र होईल आणि मनोरंजन केंद्र व शिक्षण केंद्र अशा दोन्ही बाबतीत हे केंद्र महत्त्वाचे ठरेल. सदर प्रतिष्ठान मार्फत सुरू करण्यात आलेल्या रंगीत माशांच्या उबवणी केंद्राच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी ऐरोली येथे व्यक्त केला. 

ऐरोली येथे आज जागतिक पर्यावरण दिन निमित्त महाराष्ट्र राज्य वन विभाग कांदळवन कक्ष तसेच कांदळवन प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या शो‍भिवंत माशांच्या उबवणी केंद्राचे उदघाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी तयार केलेल्या ‘बर्ड बॅण्ड’ मोबाईल ॲप्लिकेशनचे लोकार्पण आणि कांदळवन प्रतिष्ठानाला महाराष्ट्र वन विकास महामंडळाने दिलेल्या बसचे लोकार्पण मुनगंटीवर यांच्या हस्ते संपन्न झाले.

सदर कार्यक्रमास खा. राजन विचारे, आ. संदिप नाईक, आ. रमेश पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसरंक्षक वन्यजीव नितीन काकोडकर, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. रामबाबू, कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी, राष्ट्रीय मत्स्य आनुवंशिक संसाधन ब्युरो लखनऊ डॉ. कुलदीप लाल, उप वन संरक्षक, कांदळवण कक्ष मुंबई नीनू सोमराज, विरोधी पक्षनेता विजय चौगुले आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मुनगंटीवार पुढे म्हणाले की, सिंधूदुर्ग येथे खेकडा पालनाचे केंद्र सुरु केले असून या ठिकाणी महिला रोजगार दिला आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्त होत असलेल्या या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून ते म्हणाले की,आतंरराष्ट्रीय पर्यावरण दिवस हा पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्याचा दिवस आहे. यावेळी राजन विचारे, संदिप नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.