आंबिवली येथे भाजपच्या वतीने आयोजित रेशनकार्ड शिबिर संपन्न

आंबिवली येथे भाजपच्या वतीने आयोजित रेशनकार्ड शिबिर संपन्न

आंबिवली  (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे आंबिवली येथील ज्येष्ठ पदाधिकारी रमेश कोनकर यांच्या प्रयत्नाने मोहोने येथे नुकतेच रेशनकार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.

भारतीय जनता पक्षाचे स्थानिक ज्येष्ठ पदाधिकारी कोनकर मोहोने-टिटवाळा मंडळाचे सरचिटणीस प्रमोद घरत यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षाच्या मोहोने येथील जनसंपर्क कार्यालयात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, शिधावाटप नियंत्रक कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या शिबिरात नवीन रेशनकार्ड, रेशनकार्डमध्ये दुरुस्ती, दुय्यम रेशनकार्ड, पत्ता दुरुस्ती, नवीन नावे समाविष्ट करणे इत्यादी कामे करून देण्यात आली. दिवसभरात शेकडो नागरिकांनी शिबिरात येऊन त्यांची रेशनकार्डची कामे करून घेतली.

शिबिराबाबत माहिती देताना आयोजक रमेश कोनकर यांनी सांगितले की, मोहोने परिसरात अनेक नागरिक बाहेरून नव्याने येऊन स्थायिक झाले असून त्यांच्यासह व जुन्या कुटुंबांना रेशनकार्डची विविध कामे करण्यासाठी कल्याण येथील शिधावाटप कार्यालयात अनेक हेलपाटे मारावे लागतात. त्यात त्यांना अनेक अडचणी येत होत्या. यासाठी प्रभागातच रेशनकार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना जेथल्या तेथे संपूर्ण माहिती देऊन तत्काळ त्यांची नवीन रेशनकार्ड, रेशनकार्डमध्ये दुरुस्ती, दुय्यम रेशनकार्ड, पत्ता दुरुस्ती, नवीन नावे समाविष्ट करणे अशी कामे करून देण्यात आली.