यंदा ठाण्यातील हवा व ध्वनी प्रदुषणामध्ये घट

यंदा ठाण्यातील हवा व ध्वनी प्रदुषणामध्ये घट

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहराचे प्रथम नागरिक महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यंदाची दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यासाठी केलेल्या आवाहनाला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण व ध्वनी प्रदूषणामध्ये घट झाली आहे.

नागरिकांनी दिवाळी सणाचे पावित्र्य राखत सामाजिक भान ठेवून ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले होते. या आवाहनाला ठाणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यंदा ठाणेकरांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यावर भर दिला आहे.    

ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्यावतीने दीपावलीपूर्व व दीपावली कालावधीत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली आहे. त्यानुसार दिनांक ७ नोव्हेंबर २०२० रोजी दीपावलीपूर्व कालावधीत २४ तासांकरिता हवेतील धुलिकणांचे प्रमाण १२६ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके होते. नायट्रोजन ॲाक्सीजन वायुचे प्रमाण ३४ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर तर सल्फरडाय ॲाक्साईड या वायूचे प्रमाण २४ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके आढळले होते. त्याचप्रमाणे ध्वनीची अधिकतम तिव्रता ६९ डेसिबल इतकी नोंदविण्यात आली होती. 

तसेच दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी २४ तासांकरिता हवेतील तरंगते धुलिकणांचे प्रमाण १३३ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके होते व नायट्रोजन ॲाक्साईड  या वायूचे प्रमाण ३७ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर तर सल्फरडाय ॲाक्साईडचे प्रमाण २९ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर  इतके आढळले आहे तर ध्वनीची अधिकतम तीव्रता ७२ डेसिबल इतकी नोंदविण्यात आली आहे.

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी महाराष्ट्र शासनाचे दिलेले निर्देश व राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेद्वारे महापालिका क्षेत्राकरिता दीपावली २०२० मार्गदर्शक सूचना प्रसिध्द करण्यात आली होती. सदर सूचनांचे ठाणेकर नागरिकांनी तंतोतन पालन केले आहे. त्यामुळे दीपावली कालावधीत मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा हवा प्रदूषणात आणि ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. 

सन २०१८ व २०१९ च्या तुलनेत यंदा दिवाळीच्या दरम्यान हवेतील धुलीकणांचे प्रमाण ४४ टक्केपर्यंत कमी आढळले आहे तर ध्वनी पातळीत २१ ते २९ टक्क्यांपर्यंत घट झालेली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक देखील सुधारला असून त्यात ३७ पर्यंत सुधारणा झालेली आहे. दीपावली कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत ध्वनी पातळीत मोठ्या प्रमाणात घट दिसून येत लक्ष्मीपुजनाच्या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजता या कालावधीत ध्वनी तीव्रता अधिकतम म्हणजेच ७२ डेसिबल आणि ६१ डेसिबल इतकी आढळली आहे.