तारापूर औद्योगिक परिसरातील वायु प्रदूषणात घट - ना. रामदास कदम

तारापूर औद्योगिक परिसरातील वायु प्रदूषणात घट - ना. रामदास कदम

मुंबई (प्रतिनिधी) :
पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या कारखाने आणि प्रकल्पांमुळे या भागात प्रदूषणाची समस्या वाढली असली तरी सन २०१० च्या तुलनेत वायु प्रदूषणाच्या गुणांकात घट झाली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे सन २०१० मध्ये असलेले ७२ गुणांक वायू प्रदूषण आता ५० गुणांकापर्यंत घटले आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

याप्रसंगी कदम म्हणाले, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने हवा प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा १९८१ व पाणी प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा १९७४ अंतर्गत वेळोवेळी कार्यवाही केली आहे. यांतर्गत ११ कारखान्यांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रणाची अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी यासाठी करण्यात येणाऱ्या दंडात्मक रकमेतही वाढ करण्यात येईल. या चर्चेत आनंद ठाकूर, भाई जगताप, हेमंत टकले, प्रविण दरेकर, कपिल पाटील, श्रीमती हुस्नबानो खलिफे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.