वालधुनी नदीतील भराव हटवा, भूमाफियांविरोधात गुन्हे दाखल करा; अन्यथा आप करणार उपोषण 

वालधुनी नदीतील भराव हटवा, भूमाफियांविरोधात गुन्हे दाखल करा; अन्यथा आप करणार उपोषण 

कल्याण (प्रतिनिधी) : वालधुनी नदीच्या पात्रात भूमाफियांनी ठिकठिकाणी भराव टाकून अतिक्रमण केले आहे, ते त्वरित हटवा, भूमाफियांविरोधात गुन्हे दाखल करा; अन्यथा आठ दिवसांनी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते नदीच्या पात्रातच साखळी उपोषण आंदोलन सुरु करतील, असा इशारा आपचे कल्याण-डोंबिवलीचे अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सोमवारी भेटून दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन आपच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर वालधुनीच्या  उपनदीलगत मोकळा भूखंड आहे. या भूखंडालगत वालधुनी नदीच्या पात्रात सुमारे ८-१० दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात भराव टाकून भूमाफियांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथेही भूमाफियांनी वालधुनी नदीच्या पात्रात भराव टाकून त्यावर रस्ता तयार केला आहे. भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात भराव टाकून केलेल्या या अतिक्रमणाकडे आपचे अध्यक्ष जोगदंड यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले. भरावामुळे नदी किनारच्या सखल भागातील चाळवस्तीमध्ये पाणी शिरून त्यांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक पटीने वाढल्याच्या धोका त्यांनी आयुक्तांच्या नजरेस आणून दिला. यावेळी भाऊ केदारे, राजेश नाईक, कल्पेश आहेर, रवि जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्त सूर्यवंशी यांनी तात्काळ आमच्या तक्रारीची दखल घेत प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 

नदीमध्ये सदरचा भराव टाकण्याची परवानगी संबंधितांना देण्यात आली आहे का, कोणी परवानगी दिली, याची तातडीने चौकशी करण्यात यावी. सदरचा भराव येत्या ८ दिवसात काढून टाकण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत व सबंधित भूमाफियांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. येत्या ८ दिवसात हा भराव काढून सबंधित भूमाफियांविरोधात गुन्हे दाखल न केल्यास नवव्या दिवशी आम आदमी पक्षाच्या वतीने नदीच्या पात्रात भरावाच्या ठिकाणीच सनदशीर मार्गाने साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा जोगदंड यांनी निवेदनात दिला आहे.

वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने विशेष कार्यक्रम जाहीर करून त्याची अंमलबजावणी सुरु करावी, अशी मागणी देखील आपने केली आहे. यासंदर्भात कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनाही निवेदन देण्यात आले आहे.