‘स्मार्ट भूमिपुत्र’च्या माध्यमातून कल्याण येथे स्मशान भूमीचे नुतनीकरण

‘स्मार्ट भूमिपुत्र’च्या माध्यमातून कल्याण येथे स्मशान भूमीचे नुतनीकरण

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील भूमिपुत्रांनी ‘स्मार्ट भूमिपुत्र’ नावाने चळवळ उभी केली असून या चळवळीच्या माध्यमातून ८० लाखाची कामे मिळवली आहेत. यामध्ये अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या सापाड येथील स्मशान भूमीच्या नूतनीकरणाचे ५६ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.

शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली येथील स्मार्ट भूमिपुत्र तरुणांनी चळवळ उभी केली आहे. त्यानुसार कल्याण-डोंबिवली येथील होणारी शासकीय कामे भूमिपुत्रांच्या हातूनच होतील, त्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार होणार नाही आणि उत्तम प्रतीचे काम या व्हिलेज इंटरप्राइस संकल्पनेतून करण्यात येणार आहे. या अंतर्गत मोडकळीस आलेल्या स्मशान भूमीचे काम त्वरित व्हावे यासाठी स्मार्ट भूमिपुत्रांनी महानगरपालिप्रशासन व स्थानिक लोकप्रतीनिधीकडे पाठपुरावा केला. त्यानुसार सदर स्मशान भूमीच्या कामाचे टेंडर काढले गेले. सदरचे ५६ लाखाचे टेंडर कल्याण डोंबिवली महानगपालिकेत असलेल्या सापाड (कॅडर-००१), भोपर ( कॅडर-००२), कुंभारखान पाडा (कॅडर-००३), काटेमानिवली (कॅडर-००४), उंभार्ली (कॅडर-००५), गोलवली (कॅडर-००६), तसेच जुनी-डोंबिवली, गौरीपाडा या भूमिपुत्र कॅडर कंपन्यांनी एकमेकांच्या सहाय्याने मिळवले आहे.

सदर भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक जयवंत भोईर व स्वतः स्मार्ट भूमिपुत्र चळवळीचे प्रणेते शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांनी श्रीफळ वाढवून सदर कामाचे भूमिपूजन केले. यावेळी आ. भोईर यांनी सापाड गावांतील व सर्व भूमिपुत्रांचे कौतुक केले आणि वेळोवेळी त्यांना मदत करण्यासाठी कटिबध्द असल्याचे जाहीर केले. माजी आमदार नरेंद्र पवार यांनीसुद्धा भूमिपुत्रांचे कौतुक केले त्याचसोबत ते स्वतः तन, मन आणि धनाने भूमिपुत्रांसोबत राहतील, असे आश्वासन दिले.