शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा

शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा

कल्याण (प्रतिनिधी) : कोरोनासारख्या जीवघेण्या साथरोगात रुग्णसेवा देणाऱ्या व निष्ठेने काम करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेत कार्यरत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून न्याय देण्याची मागणी ऑल इंडिया लेबर्स एम्प्लॉईज युनियनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कोणार्क देसाई यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचारी २०१५ पासून अत्यंत अल्प वेतनात काम करत आहेत. कंत्राटी कर्मचारी असल्याने त्यांना शासनाच्या कोणत्याही सवलती मिळत नाहीत. सध्या कोरोना विषाणूमुळे COVID19 चा आजाराचा फैलाव होत असताना महापालिका प्रशासनाने त्याचा फैलाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना करीत आहे. त्यात आरोग्य विभागात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत वर्षोनुवर्ष कंत्राटी तत्वावर काम करणारे कामगार-कर्मचारी देखील आपले योगदान देत आहेत.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचारी कोरोनासारख्या भयंकर साथरोगातसुद्धा अत्यंत अल्प वेतन असतानाही आपले कर्तव्य सेवा निष्ठेने बजावत आहेत. अशा कर्मचार्‍यांना सेवेत कायम कर्मचारी म्हणून सामावून घेण्यात यावे, अशी भूमिका ऑल इंडिया लेबर्स एम्प्लॉईज युनियनने घेतली आहे.