वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री; भाजप आमदाराच्या नेतृत्वात निघाला मोर्चा

वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री; भाजप आमदाराच्या नेतृत्वात निघाला मोर्चा

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण शहरातील वाढत्या अमली पदार्थांची विक्री, पाठोपाठ वाढत्या गुन्हेगारी घटनांनी नागरिक त्रस्त झाले असताना या गंभीर विषयाकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कल्याण शहरातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी कल्याण पूर्वेतील काटेमनिवली नाका येथे आंदोलन केले. त्यानंतर आंदोलकांचा मोर्चा कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर धडकला.

कल्याण पूर्वेत वारंवार होणारी गुन्हेगारी व दहशतीचे वातावरण नुकत्याच वयात आलेल्या मुलांना व्यसनाच्या अधीन लावणारे व त्या अनुषंगाने होणारी अंमली पदार्थाची विक्री व सेवन ही चिंताजनक बाब बनली आहे या सर्वांना वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या नियोजनात आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे मंडल उपाध्यक्ष विजय उपाध्याय, अरुण दिघे, पांडुरंग भोसले, नितेश म्हात्रे, माजी नगरसेवक विक्रम तरे, गुड्डू खान, महाराष्ट्र प्रदेश सदस्य संदीप तांबे, महिला मंडळ अध्यक्षा प्रिया जाधव. वंदना मोरे, मीना कोठेकर, अर्चना नागपुरे, नीता सिंग आदी पदाधिकारी-कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.