धावत्या रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेला आरपीएफ जवानांने वाचवले

धावत्या रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेला आरपीएफ जवानांने वाचवले

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याणच्या रेल्वे स्थानकात  काळजाचा ठोका चुकविणारी घटना घडली. धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढताना  एका महिलेचा तोल जाऊन ती रेल्वे फलाटाच्या  गॅपमध्ये जात  असताना  रेल्वे स्थानकात  कर्तव्य बजावणाऱ्या एका  आरपीएफ  जवानाने तत्परतेने धाव घेत, त्या महिलेला फलाट व गॅपमध्ये जाण्यापूर्वीच बाहेर काढल्याने  तिचे प्राण वाचले. विजय सोळंकी असे त्या महिलेसाठी  देवदूत ठरलेल्या आरपीएफ जवानाचे नाव आहे. तर सोनी लोकेश गोवंदा (वय ३५, रा. रामवाडी, कल्याण पश्चिम ) असे जीव वाचलेल्या महिलेचे नाव आहे.

कल्याणहुन  बेंगलोरला जाण्यासाठी सोनी ह्या पती व मुलांसह मंगळवारी ९ वाजून ५ मिनिटाने सुटणाऱ्या उद्यान  एक्स्प्रेसमधून जाण्यासाठी निघाल्या होत्या. विशेष म्हणजे कल्याण  रेल्वे स्थानकात उद्यान एक्क्प्रेस वेळेवर ५ नंबर फलाटावर दाखल झाली. त्यावेळी उद्यान एक्सप्रेसमध्ये पती आणि मुले चढले. त्यांच्या पाठोपाठ सोनी ह्या ट्रेनमध्ये चढत असतानाच ट्रेन सुरु झाली. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असतानाच अचानक सोनी यांचा तोल गेला आणि त्या रेल्वे फलाटाच्या गॅपमधून रेल्वे मार्गात पडत असताना कल्याण रेल्वे स्थानकात कर्तव्य बजावणाऱ्या विजय सोळंकी या आरपीएफ जवानाने तत्परतेने प्रसंगावधान राखून धाव घेत, सोनी यांना  फलाट व गॅपमध्ये जाण्यापूर्वीच बाहेर खेचल्याने तिचे प्राण वाचले.

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. विजय सोळंकी या आरपीएफ जवानाने तत्परतेने प्रसंगावधान राखून एका महिलेचे प्राण वाचवल्याने रेल्वे प्रशासनामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.