आरपीआयचे छत्रपती शिक्षण मंडळाच्या कारभाराविरोधात कल्याण येथे आंदोलन 

आरपीआयचे छत्रपती शिक्षण मंडळाच्या कारभाराविरोधात कल्याण येथे आंदोलन 

कल्याण (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने छत्रपती शिक्षण मंडळाच्या कारभाराविरोधात  अभिनव प्राथमिक विद्यामंदिर, टिळक चौक, कल्याण येथे रिपाईच्या महिला ठाणे जिल्हाध्यक्षा अपेक्षा दळवी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेतील शिक्षक नियुक्तीमधील गैरव्यवहार व हुकूमशाही कारभारा संदर्भात विविध अशा १४ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान संस्थेच्या चिटणीस मीनाक्षी गागरे आणि भारती वेदपाठक यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन एका मागणीसंदर्भात लेखी पत्र देण्याचा प्रयत्न केला. त्यावर आंदोलनकर्त्यांनी आमच्या सर्व १४ मागण्यांबाबत काय कारवाई करणार याचे लेखी उत्तर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ठणकावले. अखेरीस संस्थेच्या वतीने येत्या दहा ते बारा दिवसांत कारवाई करण्याचे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले व त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपसचिव मामा गायकवाड, डी बी एन संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद वानखेडे, कल्याण-डोंबिवली महिला जिल्हाध्यक्षा मीनाताई साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यासंदर्भात पत्रकारांनी संस्थेच्या चिटणीस मीनाक्षी गागरे आणि भारती वेदपाठक यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता आम्ही दिलेले लेखी पत्र हेच आमची प्रतिक्रिया असल्याचे त्या म्हणाल्या.