अन्यायकारक करवाढ रद्द करण्याची रिपाईची मागणी

अन्यायकारक करवाढ रद्द करण्याची रिपाईची मागणी

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद करून कचरा उचलण्यासाठी करामध्ये केलेली वाढ रद्द करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते, शहर अध्यक्ष संजय जाधव यांनी महापालिका प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेने कचरा उचलण्यासाठी प्रति दिन दोन रुपये वाढ कर पावतीमध्ये केली आहे. परिणामी आधीच सर्व महापालिकांमध्ये सर्वाधिक कर आकाणारी महापालिका म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिप्रसिद्ध आहे. त्यातच दोनशे टक्के शास्ती नविन करधारकास महापालिकेने केली आहे. आणि  आता प्रति दिन दोन रुपये म्हणजे वर्षाला सातशे वीस रुपये भुर्दड करापोटी महापालिका क्षेत्रातील करदात्या रहिवाशांना सोसावा लागणार आहे. कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचे कंबरडे मोडले असून त्यातच ही कर वाढ अन्यायी असल्याने सदरची महापालिकेने केलेली कर वाढ रद्द करावी. अन्यथा पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात रिपाईने दिला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते, जिल्हा उपाध्यक्ष अशोक लिहितकर, कल्याण शहर अध्यक्ष संजय जाधव आदी उपस्थित होते.