डोंगरी विभाग विकास कार्यक्रमासाठी ३१ कोटी रुपयांचा निधी वितरित

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमासाठी ३१ कोटी रुपयांचा निधी वितरित

मुंबई (प्रतिनिधी) : 
डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यातील खर्च भागविण्यासाठी ३१ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

यासंबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती देऊन ते म्हणाले,डोंगरी भागाच्या विकासासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ९५ कोटी  रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. त्यातून चार महिन्यांच्या खर्चासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड,नांदेड, हिंगोली, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदूरबार, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या विकासाला  यातून चालना मिळणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. हा निधी घालून दिलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून खर्च करता येईल. नियोजन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे.