५० दिवसांपासून कोरोना विरोधात लढणाऱ्या आरएसपी शिक्षकांचे होत आहे कौतुक

५० दिवसांपासून कोरोना विरोधात लढणाऱ्या आरएसपी शिक्षकांचे होत आहे कौतुक

कल्याण (प्रतिनिधी) : लॉकडाऊन सुरू झाला, शाळा बंद झाल्या, सगळे व्यवहार ठप्प झाले. पोलीस, डॉक्टर, नर्स सगळेच कोरोनाला हरविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या जोडीला सलग ५० दिवस शाळा बंद असतानाही आरएसपी शिक्षक पोलिसांसोबत काम करत आहेत. कल्याणमधील शहाड नाका, गांधारी व दुर्गाडी भागातील नाकाबंदी, चेकपोस्टवर गाड्यांची तपासणी यासह विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, जेवणाची सोय करण्याचे कामही आरएसपी शिक्षक करीत आहे.

आरएसपी हा शालेय स्तरावरचा विषय आहे. विद्यार्थ्यांना ट्रॅफिकचे नियम शिकविणे, त्यांच्यात ट्रॅफिक सेन्स निर्माण करणे हे दैनंदिन अभ्यासासोबत आरएसपी शिक्षक करीत असतात. परंतु लॉकडाउनच्या काळात पोलिसांवर येणारा ताण कमी व्हावा यासाठी कल्याण डोंबिवलीचे आरएसपी कमांडर मनीलाल शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिसरातील विविध शाळांमधील तसेच मुंबईतील शाळांमधील परंतु वास्तव्याला कल्याणला असणारे १८ शिक्षक सलग ५० दिवसांपासून कोरोनाच्या बंदीबस्तात पोलीस खात्याला सहकार्य करीत आहेत.

कल्याण डोंबिवलीचे आरएसपी कमांडर व आयईएस टिटवाळा शाळेतील शिक्षक मनिलाल शिंपी, महादेव क्षीरसागर नूतन विद्यालय कल्याण, अनंत किनगे,  बन्सीलाल महाजन सिद्धार्थ माध्यमिक विद्यालय मोहने, कैलास पाटील गणेश विद्यामंदीर कोळसेवाडी, बापू शिंपी, दिलीप पावरा गजानन विद्यालय कल्याण, जितेंद्र सोनवणे कै बापुराव आधारकर शाळा, योगेश अहिरे सहकार विद्यालय कळवा,  दत्तात्रय पाटील झुलेलाल ट्रस्ट स्कुल व ज्यु कॉलेज उल्हासनगर-२, रितेश पाटील नेताजी हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज उल्हासनगर, तर मुंबईतील अनिल बोरनारे स्वामी मुक्तानंद हायस्कुल चेंबूर, केशव मालुंजकर, पांडुरंग विद्यालय मुलुंड, रामदास भोकनळ अभ्युदय विद्यालय घाटकोपर,  सचिन मालपुरे अग्रसेन हिंदी विद्यालय विक्रोळी, राजेंद्र गोसावी एल. के. हायस्कुल चुनाभट्टी, तुषार बोरसे, तुलिप इंग्लिश स्कुल, घाटकोपर, भारती जाधव ज्ञानसंपदा हायस्कुल, गोवंडी यांचा समावेश आहे. त्यांनी दोन हजार गरजू कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले आहे.

जनता कर्फ्युपासून सुरू झालेली ही सेवा लॉकडाउन ३ व पुढे सलग करण्याचा या शिक्षकांचा मानस आहे. या आरएसपी शिक्षकांच्या कामगिरीवर खुश होऊन पोलिस कल्याण परिमंडळचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी या सर्व शिक्षकांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी तडवी यांनी या शिक्षकांची शहाड नाका येथे जाऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी शेषराव बडे, शिक्षण निरीक्षक उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख, कोकण पदवीधर शिक्षक आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही त्यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे.