कल्याणात आरटीओ वाहन तपासणी केंद्र ठरतेय वाहतूक कोंडीचे कारण

कल्याणात आरटीओ वाहन तपासणी केंद्र ठरतेय वाहतूक कोंडीचे कारण

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील द्वारली येथे असलेल्या आरटीओच्या अवजड वाहन तपासणी केंद्रावर पासिंगकरीता येणारी अवजड वाहने मलंगगड रस्त्याच्या कडेला उभी केली जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लाब रांगा लागत असल्याचे समोर येत आहे. अनेक कारणांमुळे कल्याण शहर आधीच वाहतूक कोंडीला तोंड देत असताना मलंगगड रस्त्याला देखील वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे.

कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावर द्वारली येथे आरटीओचे अवजड वाहन तपासणी केंद्र आहे. या केंद्रावर जिल्ह्याच्या विविध भागातून दररोज असंख्य वाहने पासिंगसाठी येतात. वाहनांची तपासणी करण्यास वेळ लागत असल्याने तपासणीसाठी येणारी अवजड वाहने मलंगगड रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लाब रांगा लागत असल्याचे समोर येत आहे. द्वारली ते माणेरे गावात जाणारा रस्ता हा पूर्णपणे अशा अवजड वाहनांनी बळकावला जातो. नमस्कार ढाबा ते येथील आरटीओ केंद्रापासून माणेरे गावाच्या हद्दीपर्यंत, दुसरीकडे नमस्कार ढाबा ते काकाच्या ढाबापर्यंत अशी प्रचंड २-३ किमीपर्यंत रांगा लागतात. त्यामुळे या मार्गावर वाहतूक प्रचंड वाहतूक कोंडी होऊन त्याचा इतर वाहनचालकांना व प्रवाशांना प्रचंड त्रास तसेच मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

सदर मलंगगड रस्त्यावर शाळा, रुग्णालय इत्यादी असल्याने येथील वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिका आणि  विद्यार्थी वाहतुकीला देखील फटका बसत आहे. फेरीवाले-विक्रेत्यांची या रस्त्यावरील अतिक्रमणे नेहेमीची झाली आहेत. अशातच पासिंगसाठी सुट्टीच्या दिवशी देखील येथे वाहने येतात व ती रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे उभी केली जातात. परिणामी आरटीओचे तपासणी केंद्र वाहतूक कोंडीला कारण ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

एका प्रत्यक्षदर्शीने या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा आलेला अनुभव कथन केला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. सुमारास या रस्त्याने जाणारी केडीएमटीची बस द्वारली गाव ओलांडल्यानंतर गावरान ढाब्याजवळ पोहोचली. तेथे असंख्य अवजड वाहने भररस्त्यात उभी केली गेली असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच समोरून येणाऱ्या वाहने अरुंद रस्त्यामुळे समोरासमोर आल्याने त्यांच्या चालकांची केडीएमटीच्या चालकाशी बराच वेळ  बोलाचाली-शिविगाळ झाली. असे चित्र दररोज या ठिकाणी पाहायला मिळत असल्याचे येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत.