केडीएमसीच्या कोविड हॅास्पीटलसाठी ‘सहयोग’ने दिले १० बेड

केडीएमसीच्या कोविड हॅास्पीटलसाठी ‘सहयोग’ने दिले १० बेड

कल्याण (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात कोरोना दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू असुन दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रूग्ण संख्येचा आलेख पाहता हँस्पिटलमध्ये बेडची कमतरता असल्याची ओरड होत आहे. ही बाब ध्यानात घेत कल्याण पूर्वेतील सहयोग सामाजिक संस्थेने पुढाकार घेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलला १० बेडचा संच देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

कल्याण पूर्वत राहणारे सामाजिक बांधलिकीचा वसा जपणारे सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले यांच्या पत्नी उज्वला भोसले  यांचा  कोरोना रिपोर्ट कोवीड पोझीटीव्ह आल्याने त्यांना मनपाच्या टाटा आमंत्रा येथे ठेवण्यात आले होते. उपचाराअंती सहा दिवसानंतर उज्ज्वला यांना घरी सोडण्यात आले. यावेळी विजय भोसले यांनी महापालिका प्रशासन नागरिकांना एवढ्या चांगल्या सुविधा देत असताना, लोक खाजगी दवाखान्यात जाऊन लाखो रुपयांची बिले का भरतात, असा प्रश्न पडला. माझी पत्नी जर खाजगी दवाखान्यात असती तर कमीत कमी १ लाख रु तरी बिल झाले असते, असा विचार त्यांच्या मनाला शिवून गेला. 

या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड कमी पडत असल्याचे समजल्याने विजय भोसले यांनी विचार केला की, आपल्या पत्नीला खाजगी रुग्णालयात दाखल केले असते तर आपल्यालाही लाख रुपये बिल भरावे लागले असते. त्यामुळे महापालिका एवढी चांगली सुविधा देते, तर आपणही सामाजिक बांधलिकीतून कोरोना विरोधातील लढाईसाठी हातभार लावला पाहिजे या जाणीवेतून त्यांनी आपल्या सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने डोंबिवली जिमखाना कोवीड सेंटरला १० बेडचे सर्व साहित्य देण्याचे ठरविले. त्याकरिता त्यांनी महापालिका आयुक्तांच्या परवानगीने संस्थेच्या वतीने जिमखाना कोवीड सेंटरला नुकतेच १० लोखंडी बेड्स, १० फोमच्या गाद्या आणि १० उशा सुपूर्द केल्या. याप्रसंगी ओम साई हेल्थ केअरचे सीईओ साहिल, रोटरी क्लब कल्याण पूर्वचे संदिप चौधरी,  महापालिका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष प्रविण भोसले, कालीदास कदम, परिवहन समितीचे माजी सभापती सुभाष म्हस्के आदी होते.

महापालिका आयुक्त डाँ. विजय सूर्यवंशी यांनी सहयोग सामाजिक संस्थेचे काम अभिनंदनीय असल्याचे कळवित त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. आमदार रविद्र चव्हाण यांनी देखिल ह्या उपक्रमाचे कौतूक केले.