संभाजी ब्रिगेडच्या वतीने गणेशपुरी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

संभाजी ब्रिगेडच्या वतीने गणेशपुरी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

गणेशपुरी (प्रतिनिधी) : भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर शारीरिक अंतर ठेऊन संपन्न झाले.

कोरोना विषाणू संसर्गच्या संकटात राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवू शकतो म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष अॅड. मनोज आखरे, प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण राज्यात ३१ मे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती ते ६ जून शिवराज्याभिषेक सोहळा या कालावधीत भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार पालघर जिल्ह्यात ६ जून रोजी गणेशपुरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

रक्तदान शीबीराचे उद्घाटन संभाजी ब्रिगेड मुंबईचे सल्लागार संजय होले व नवसु पाटील यांनी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मानवाला वाचवण्यासाठी संभाजी ब्रिगेड नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे विविध उपक्रम राबवित आहे. तसेच रुग्णांना हॉस्पिटल व लॅबमध्ये ने-आण करण्याची मोफत व्यवस्था संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पालघर जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश पाटील यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी रक्तदान शिबिराला सहकार्य करणारे प्रविण मेहता, रामू मामा नाईक, साथीया ब्लड बँक व राजमाता जिजाऊ धर्मदाय रुग्णालय, अंबाडी यांचे आभार मानले आहेत. प्रवीण सरवदे, मोनिष चव्हाण, राहुल चव्हाण, मनमोहन यादव, प्रितेश अनावकर, राम गवारी व सुनील देवरे आदी सामाजिक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.