नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात सम्यक विद्यार्थी’चे राष्ट्रीय अधिवेशन

नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात सम्यक विद्यार्थी’चे राष्ट्रीय अधिवेशन

कल्याण (प्रतिनिधी) : नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने नवे शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन १५ व १६ सप्टेंबर रोजी डोंबिवली येथील सरस्वती विद्या भवन फार्मसी कॉलेज, शंकरनगर सोनारपाडा डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले आहे. याबाबतची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश भारतीय, मयुर मोहिते, प्रतिक साबळे, रुपेश हुंबरे, कमलेश उबाळे, रोहित डोळस आदी पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारने भारतात नवे शैक्षणिक धोरण लागू केले परंतु हे धोरण विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. संबंधित शैक्षणिक धोरण २०२०  हे विद्यार्थ्यांना गुलाम करू पाहात आहे. या शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाचे खाजगीकरण बाजारीकरण करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे सरकारचे धोरण असल्याने या शैक्षणिक धोरण २०२० यांच्या संदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या माध्यमातून राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात येणार आहे.

शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण थांबविण्यात यावे. केंद्रीय व राज्य विद्यापीठांचे खाजगीकरण थांबविण्यात यावे. विद्यार्थ्याचे लोकशाही अधिकार अबाधित राहण्यासाठी श्रीमंतांना शैक्षणिक कर लावण्यात यावे अशी या राष्ट्रीय अधिवेशनाच्या माध्यमातून मागणी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अधिवेशनाचे प्रास्ताविक सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश भारतीय करणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक राजस्थान विद्यापीठ कुलगुरू आणि वंचित बहुजन आघाडी महा.राज्य उपाध्यक्ष डॉ. अरुण सावंत हे करणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे  प्रा. हमराज उईके हे असणार आहेत. तसेच या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून भीमराव आंबेडकर, रेखा ठाकूर, प्रा. मृदुल निळे, डॉ. आर. वरदराजन, तापती मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.