नैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी सरदार वल्लभभाई पटेल लोकविद्यापीठ

कल्याण (प्रतिनिधी) : नैसर्गिक शेती तंत्रज्ञान आणि पिक उत्पादनाच्या प्रचारासाठी कल्याण येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल लोक विद्यापीठाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा लोक विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष तथा संचालक अॅड. धनंजय जोगदंड यांनी सोमवारी येथे केली. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत लोक विद्यापीठाच्या स्थापनेचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय कुर्मी क्षत्रीय महासभेचे कल्याणचे कार्याध्यक्ष असलेले अॅड. धनंजय जोगदंड यांनी देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याने आपण प्रभावित झाल्याने त्यांच्या नावाने हे लोक विद्यापीठ स्थापन करण्यात येत असल्याचे सांगितले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल लोक विद्यापीठाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात नैसर्गिक शेती तंत्रज्ञान आणि पिक उत्पादनाच्या प्रचाराचे कार्य हाती घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आत्मा (Agricultural Technology Management Agency), ठाणे यांचेकरिता सपोर्ट फॉर एक्स्टेन्शनचे काम देखील हे लोक विद्यापीठ करणार आहे.
कल्याण पूर्व येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एका सभेत लोक विद्यापीठाच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी बैठकीला उपस्थित असलेले छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ, कल्याणचे महासंचालक डॉ. मंगेश देशमुख यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल लोक विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाशी संलग्नता देण्यात येत असल्याचे जाहीर केल्याची माहितीही जोगदंड यांनी दिली. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल लोक विद्यापीठाचे रजिस्ट्रार म्हणून प्रविण आंब्रे यांची नियुक्ती करण्यात आली असून अधिक माहितीसाठी ९३२३२११३४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.