वडवली उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला शनिवारचा मुहूर्त

वडवली उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला शनिवारचा मुहूर्त

कल्याण (प्रतिनिधी) : तब्बल १३ वर्षांनी पूर्णत्वास आलेल्या येथील बहुचर्चित वडवली रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला अखेर शनिवारचा मुहूर्त लाभला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर वालधुनी नदीवरील शहाड येथील पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे देखील लोकार्पण करण्यात येणार आहे.

वडवली येथील रेल्वे उड्डाणपूल नागरिकांच्या सोयीसाठी वाहतुकीला लवकर खुला व्हावा या  मुद्यावरून धुलिवंदना आधीच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राजकीय धुळवड रंगली होती. अखेरीस शनिवारी उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी नगरविकास मंत्र्यांसह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खा. कपिल पाटील, मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक शलब गोयल, स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक, आमदार बाळाराम पाटील, आमदार रमेश पाटील, आमदार राजू पाटील, आमदार गणपत गायकवाड, आमदार रविंद्र चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह स्थानिक नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.