कठडे नसल्याने सावरोली पूल बनलाय धोकादायक!

कठडे नसल्याने सावरोली पूल बनलाय धोकादायक!

शहापूर (पंडीत मसणे) :
वासिंद-कांबारे या प्रमुख जिल्हा मार्गावरील सावरोली गावाजवळील तानसा नदीवर असलेल्या पुलाचे कठडे तुटल्याने सध्यास्थितीत हा पुल धोकादायक बनला आहे.

शहापुर तालुक्यातील  वासिंद-कांबारे हा प्रमुख जिल्हा मार्ग असलेला रस्ता वाड्याला जोडला गेला आहे. सदर, रस्त्यावरून वासिंद, शहापुर, ठाणे, मुंबई तसेच वाडा, मनोर, गुजरातकडे जाणाऱ्या या मार्गावरून सततची रहदारी सुरू असते. वासिंद पासून पंधरा-सोहळा किमी अंतरावर सावरोली या गावाजवळ तानसा नदीवर असलेला या पुलाचे संरक्षित असलेले दोन्ही बाजूचे लोखंडी दांडे पुर्णपणे निघून गेल्याने हा पुल असुरक्षित बनला आहे.

सध्या तात्पुरत्या स्वरूपात पुलाच्या दोन्ही बाजूला कापडी दोरी (रस्सी) बांधल्याचे दिसून येत आहे. सध्या नदीच्या पात्रात अधिक पाणी असते. तसेच पुलाच्या बाजूला मजबूत आधार नसल्यामुळे येता-जाता वाहन नदीत पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दुर्दैवाने येथे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, येथे लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी सदर पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांकडून केली जात आहे.