शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू; शाळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर 

शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू; शाळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर 

कल्याण (प्रतिनिधी) : 
सतत पडणाऱ्या पावसात कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ल्यासमोरील नॅशनल उर्दू हायस्कूलची संरक्षण भिंत कोसळून लगतच्या झोपड्यांवर पडल्‍याने या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन महिला आणि एका तीन वर्षीय मुलाचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे महापालिका हद्दीतील शाळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून कोकण पट्ट्यात दुवाधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पुणे, मुंबई नंतर कल्याण शहरातील नॅशनल उर्दू हायस्कूल या शाळेची संरक्षण भिंत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बचाव पथकाने घटना स्थळी धाव घेत ढिगाऱ्याखालून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. सदर दुर्घटनेत शोभा कांबळे (वय ६०), करीना मोहम्मद चंद (वय २५) आणि हुसेन मोहम्मद चंद (वय ३), अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत, तर आरती राजू कर्डीले (वय १६) असे जखमी मुलीचे नाव आहे. जखमी आरतीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी ऐतिहासिक भटाळे तलाव आहे. या तलावाच्या जागेत  मातीचा भराव टाकून स्थानिक भूमाफियांनी तेथे अनधिकृतपणे झोपड्या उभारल्या आहेत. त्याला महापालिका अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची परिसरात चर्चा आहे. 

मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील स्थानिक भूमाफियांनी चित्रीकरण करण्यास विरोध केला. दरम्यान, सदर शाळेलगत भटाळे तलावाच्या जागेत मातीचा भराव टाकून उभारण्यात आलेल्या बांधकामावर आता तरी महापालिका कारवाई करणार का, असा सवाल या दुर्घटनेमुळे उपस्थित झाला आहे.