पाली शहराला भंगार दुकानांचा विळखा; जळत्या भंगाराच्या धुराने नागरिक हैराण

पाली शहराला भंगार दुकानांचा विळखा; जळत्या भंगाराच्या धुराने नागरिक हैराण

पाली-सुधागड (परेश शिंदे) :
सुधागडातील पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे खरेदी विक्री करण्यास तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिक येथे येत असतात. तसेच श्रीबल्लाळेश्वराचे मंदिर असल्याने भाविकांची मोठी गर्दी असते. ऐतिहासिक गड, किल्ले, गरम पाण्याचे झरे, लेण्या, गुफा यांसह पर्यटन स्थळे असून येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. अशा पाली सुधागडाच्या पावनभूमीत परप्रांतीयांनी भंगाराची दुकाने थाटली आहेत.

पालीसह सुधागड येथे २५ ते ३० भंगाराची दुकाने असून भंगार जमा करणाऱ्यांची संख्या वाढती आहे. त्यामुळे तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे. या भंगार दुकानांचे मालक दिवसरात्र बिनधास्त भंगारातील कचरा जागेवरच जळतात. त्यामुळे होणाऱ्या धुरामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच पाली शहरात उष्णता ४५ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याने पालीतील जनता आधीच हैराण झाली आहे. त्यातच या भंगार कंपनीच्या धुराचा फैलाव होत असल्याने परिसरात रोगराई पसरण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. तत्काळ या भंगार कंपनीच्या मालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. संबधित ग्रामपंचायत व अधिकारी यांनी या भंगार दुकानांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून हटविण्यात यावे, अशी मागणी पालीतील ग्रामस्थ करीत आहेत. प्रशासनाने या भंगार दुकानांवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा जागरूक ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.