‘रस्ते सुरक्षा सप्ताहा’त आंबिवली-टिटवाळा रस्ता सुरक्षित करा!

‘रस्ते सुरक्षा सप्ताहा’त आंबिवली-टिटवाळा रस्ता सुरक्षित करा!

कल्याण (प्रविण आंब्रे) : आंबिवली ते टिटवाळा रस्त्याची दुरवस्था झाली असून कल्याण डोंबिवली महापालिकेचे (केडीएमसी) प्रशासक तथा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वत: या रस्त्याची ‘रस्ते सुरक्षा सप्ताहा’त पाहणी करून वाहनचालक-नागरिकांना अपघातमुक्त सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, तसेच शहरातील सर्वच रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडीट करून घ्यावे, अशी मागणी प्रवासी कल्याणकारी संघ, महाराष्ट्रचे अध्यक्ष रमेश कोनकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

कल्याणमधील आंबिवली ते टिटवाळा रस्त्याची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. या रस्त्यावर अपघात होण्याची भीती जागरूक नागरिक व वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे. एकीकडे शहरात रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा केला जात असून या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाला मंगळवारी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी देखील उपस्थिती दर्शविली असली तरी शहरातील रस्त्यांची स्थिती म्हणावी तशी सुरक्षित नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेतील रस्त्यांच्या स्थितीबाबत ‘कल्याण सारखे रस्ते महाराष्ट्रात कुठेही नसतील’, असे उपरोधिक उद्गार काढले होते.

वडवली फाटक येथून ते टिटवाळा रेल्वे फाटकापर्यंतच्या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर असंख्य ठिकाणी खड्डे भरून निर्माण झालेले उंचवटे, बल्याणी चौकाच्या पुढे व मागे अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीमुळे रस्त्यांवर पाणी येऊन रस्ते निसरडे होत आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला ठेवल्या जाणाऱ्या बांधकामाच्या रेती, खडी व माती अशा साहित्यामुळे वाहनांना अपघात होण्याची शक्यता आहे. बल्याणी येथे या रस्यावर पावसाळ्यात व त्यानंतर देखील काही वेळा खड्डे भरण्याचे काम केले गेले, मात्र हे खड्डे भरण्याचे काम शास्त्रोक्तपणे केले जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरीकांकडून केला जात आहे. बल्याणी ते आंबिवली रेल्वे स्टेशन दरम्यान या रस्त्यावर दोन-तीन ठिकाणी रस्त्याच्या बाजूचा मातीचा आधार निघून गेला आहे. गेल्या काही दिवसात या रस्त्यावर काही अपघात झाल्याच्या घटना घडल्याचे सांगितले जात असून ते किरकोळ घटनांवर निभावले असले तरी भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वत: या रस्त्याची ‘रस्ते सुरक्षा सप्ताहात पाहणी करून वाहनचालक व नागरिकांना अपघात मुक्त सुरक्षित रस्ता उपलभ करून द्यावा. व शहरातील सर्वच रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडीट करून घ्यावे, अशी प्रतिक्रिया प्रवासी कल्याणकारी संघ, महाराष्ट्रचे अध्यक्ष रमेश कोनकर यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे दर पंधरवड्यात महापालिका अभियंता व वाहतूक पोलीस यांनी शहरातील रस्त्यांचे पाहणी करून आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात, रस्त्यांना ठिकठिकाणी विविध प्रकारचे दिशादर्शक चिन्हे लावण्यात यावीत, अशाही सूचना कोनकर यांनी केल्या आहेत.