ताटातले विक आणि माग भिक

ताटातले विक आणि माग भिक

अशी काहीशी परिस्थिती देशात आज निर्माण झालेली आहे, याचे दोन संदर्भ आहेत की मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारला (ध्वनिलहरी ) SEPTRUM विक्री हक्कातून बोलीद्वारे चार लाख करोड रुपये प्राप्त होणार आहेत, तर दुसरीकडे कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढल्याने ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा आणि मागणी यातील तफावत त्यामुळे केंद्र सरकारने ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच एकीकडे  स्पेक्ट्रम विक्रीतून सरकार करोडो रुपये कमवत आहेत, तर दुसरीकडे निसर्ग निर्मित जी  हवा (ऑक्सिजन) सजीवाला जगण्यास आवश्यक आहे, त्याशिवाय माणूस क्षणभरही जगू शकत नाही, त्यासाठी आपला देश अद्याप पर्यंत आत्मनिर्भर झाला नाही असे यातून प्रतिबिंबित होते.

उशा पायथाले पटोळी

झोप लागेना मोकळी

या म्हणी प्रमाणे सर्व परिस्थिती अनुकूल असून आज नियोजन आभावी प्राणघातक  अवस्था निर्मिती झाली आहे झाली आहे. स्पेक्‍ट्रम द्वारे मिळणाऱ्या पैशातून आरोग्यविषयक सुविधा निर्मिती करण्यास प्राप्त होणाऱ्या  सरकारला कर रकमेतून अशा रकमेचे नियोजनात्मक विनियोग करण्यास आपण कुठेतरी कमी पडत आहोत असे मला वाटते ...

द्यावे तसे घ्यावे

हा सुखाचा मूलमंत्र आहे. पण यामध्ये उत्पन्न, खर्च, नियोजन याचा कुठलाही ताळमेळ बसत नाही, 

कोरोना सारख्या महामारी मुळे येणाऱ्या या रोगाचे परिणाम भयानक असतील व त्यासाठी आपणास आरोग्य व्यवस्थेवरील सुविधांसाठी किती खर्च करणे अपेक्षित आहे व आरोग्य व्यवस्था याचा विस्तार, व्याप्ती आणि सुविधा याचे नियोजन व आकलन करण्यास सरकार सपशेल अयशस्वी झालेली आहे. नियोजनाच्या अभावामुळे कोरोना सारख्या महामारीचा फैलाव देशात वाढत असून अनेक नागरीक त्यास बळी पडत आहेत.

जगात वेगवान संवादाचे  त्याचबरोबर संपर्क आणि दळणवळणाचे साधन म्हणजे इंटरनेट, मोबाईल व्यवस्था व इतर संगणकीय प्रणाली याची व्याप्ती  वाढत असल्याने त्याच्याशी निगडित असणारे नवीन उद्योग स्थापन होत असून ते उत्पादनाची साधने बनत आहेत. म्हणजे इथून पुढे उत्पादनाच्या साधनांची कमी राहणार नाही त्याचबरोबर वेगवेगळ्या परवानग्या, स्पेक्ट्रम सारख्या फक्त हवेतून पैसा कमावणाऱ्या योजना इथून पुढे निर्मित होतील. शा संसाधनाचे व स्त्रोतांचे अधिकार हे सरकारकडे असतात. ते काही कालावधीसाठी खाजगी कंपन्यांना कराराद्वारे देऊन विनासायास बख्खळ पैसा कमावण्याचे इथून   पुढे साधने असतील! म्हणजेच उत्पादन स्तोत्र वाढतील. पण त्याच बरोबर आवश्यकता आहे की, निसर्ग संसाधनाचे हानी होऊन, पर्यावरणाचा घात होऊन हे उद्योग स्थापन झाले तर नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सरकारने घेणेही  क्रमप्राप्त आहे.

भारत देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातवा असून निसर्ग संसाधना मध्ये जगात परिपूर्ण आहे, भारत देशात ऊन, वारा पाऊस मुबलक असल्याने येथील वातावरण मानवी जीवनास आल्हाददायक आहे, पण नेमकी उलटी परिस्थिती सध्या होत असून कोरोनाचा प्रसार देशात वाढत आहे.

चला, तुम्ही हवा विका, पण आम्हाला मुक्त हवा हवा तरी खाऊ द्या, अशा नागरिकांच्या  अपेक्षा  असतील यात शंका नाही. राजकीय धूळफेक करून सुमधुर संवाद साधून नुसती जनतेच्या डोक्यात हवा भरून या देशात स्थैर्य, शांतता व विकास साधला जाणार नाही. आज मित्रहो,  देशवासीयांना आर्थिक विकासाबरोबर सक्षम निरोगी, आनंदी जीवन व आरोग्य सुविधा उपलब्ध असणारी व्यवस्था हवी आहे!
जय भारत!!!
---
लेखक: डॉ. डी. एस. काटे (औरंगाबाद)
(प्रख्यात अर्थतज्ञ व यशस्वी उद्योजक)