नालेसफाईच्या न झालेल्या कामांचे फोटो पाठवा- नरेश म्हस्के

नालेसफाईच्या न झालेल्या कामांचे फोटो पाठवा- नरेश म्हस्के

ठाणे (प्रतिनिधी) : मान्सूनपूर्व कामे शहरात सुरू आहेत. सर्व प्रभाग समितीतील काही नालेसफाईच्या कामांची पाहणी नुकतीच महापौर नरेश  म्हस्के यांनी स्थानिक नगरसेवकांसमवेत केली. मात्र सर्वच ठिकाणी पाहणी दौरा करणे शक्य नसल्याने आपआपल्या विभागातील कामे जर झाली नसतील तर त्याचे फोटो, माहिती आमच्याकडे पाठवा, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी  नागरिकांना केले आहे.

एकीकडे कोरोनाशी युध्द  सुरु असताना महापालिका यंत्रणा मान्सून पुर्व कामांमध्ये सुध्दा व्यग्र आहे. महापौर म्हस्के यांनी नुकताच दौरा करुन नालेसफाईच्पा कामांची पाहणी केली. सर्व विभागातील एका प्रमुख नाल्यांची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी नाल्यांची ७० टक्के कामे पूर्ण झाली होती व उर्वरित कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.  मात्र शहरातील सर्व नाल्यांची पाहणी करणे शक्य नाही. त्यामुळे सर्व प्रभागसमितीत नालेसफाईची जी कामे सुरू आहेत ती व्यवस्थित झाली आहेत का? कंत्राटदाराने केवळ फ्लोटींग मटेरियल काढून कंत्राटदार कामाचा दिखावा तर करीत नाही ना? सर्व गाळ नीट काढला का? काढलेला गाळ उचलला आहे का? की नाल्यांची वरचेवर साफसफाई केली आहे ? याचे वास्तववादी चित्र कळावे म्हणून महापौरांनी आता नागरिकांना आवाहन केले आहे.

ज्या ठिकाणी कामे झाली नसतील अथवा अपूर्ण असतील त्याची माहिती फोटोसह ३१ मे नंतर ९९६९०३२३३० या  क्रमांकांवर व्हाँटसअँपवर पाठवा, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकर नागरिकांना केले आहे.