कडोंमपा: फौजदारी गुन्ह्याखाली कारवाई झालेल्या २६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवा पुनर्स्थापित

कडोंमपा: फौजदारी गुन्ह्याखाली कारवाई झालेल्या २६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवा पुनर्स्थापित

कल्याण (प्रतिनिधी) :
शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने जानेवारी १४ पासून फौजदारी गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल झालेल्या २६ अधिकारी-कर्मचारी-कामगारांची सेवा पुनर्स्थापित केल्याचे उघड झाले आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या निलंबन आढावा समितीच्या शिफारशीनुसार व शासन निर्णय १४ ऑक्टोबर २०१४ च्या आदेशानुसार फौजदारी गुन्हा दाखल झाल्यामुळे सेवेतून निलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांना सेवेत अकार्यकारी पदावर पुनर्स्थापित करण्याची तरतूद असता त्यातील काहींना पदोन्नती देत त्यांची स्थापना केली गेली आहे. फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नियुक्ती प्राधिकरण नियमानुसार सर्वसाधारण सभा असताही ‘अशा’ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व काहींना पदोन्नती देऊन प्रशासनाने महासभेच्याही अधिकारावर अतिक्रमण केले आहे. आता त्यांच्या नियुक्त्या करून बराचसा कालावधी लोटल्यानंतर हे विषय महासभेच्या पटलावर माहितीसाठी प्रशासनाने ठेवले आहेत.

सुनील जोशी (कार्यकारी अभियंता व प्रभारी सहाय्यक संचालक, नगररचना), सुहास गुप्ते (उपलेखापाल), डॉ. राजू लवंगारे (वैद्यकीय अधिकारी), गणेश बोराडे (प्रभाग क्षेत्र अधिकारी), स्वाती गरुड (कर निरीक्षक), राजन ननावरे (परिवहन कार्यालयीन अधीक्षक), संजय धात्रक, सदाशिव ठाकरे (आरोग्य निरीक्षक) यांची पुनर्स्थापना करण्यात आली असून ४ सफाई कामगार, कामगार, व्हॉल्वमन, शिपाई यांनाही सेवेत सहभागी करून घेतले गेले आहे. यातील सर्व निलंबिताविरोधात विभागीय चौकशी, न्यायालयीन अभियोग सुरु असताही त्यांची कार्यकारी पदावर नियुक्त्या करण्यात प्रशासनाने चलाखी केली आहे. त्यांच्या पदोन्नतीसाठी प्रशासनाकडून प्रशासकीय अडचणींच्या सबबी पुढे केल्या गेल्या आहेत. महापालिकेतील ११ कार्यकारी  अभियंत्यांच्या ठिकाणी सध्या तीनच कार्यकारी अभियंते उपलब्ध आहेत. प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांची ८ ऐवजी ४ पदेच कार्यरत आहेत. १० प्रभाग क्षेत्रांसाठीही पदे कमी आहेत. सरळ सेवा भरतीवर शासनाचे निर्बंध लागू असल्याच्या  सबबीवर या निलाबितांची सेवा पुनर्स्थापित करताना त्यांना त्यांच्या मुळ पदावर न ठेवता पदोन्नती दिल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.