महाविकास आघाडीच्या निषेधासाठी संभाजी ब्रिगेडचे स्मशानात मुंडन आंदोलन

महाविकास आघाडीच्या निषेधासाठी संभाजी ब्रिगेडचे स्मशानात मुंडन आंदोलन

पालघर (प्रतिनिधी) : पत्रकार गिरीष कुबेर यांच्या ‘रिनैसंस स्टेट’ या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराज व मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्या विषयी आक्षेपार्ह लिखाण व पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने संभाजी ब्रिगेड पालघरच्या वतीने येथे स्मशानात मुंडन आंदोलन करीत महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. 

गिरीष कुबेर यांच्या ‘रिनैसंस स्टेट’ पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी ब्रिगेडने केली होती. एवढे गंभीर व आक्षेपार्ह लिखाण केलेले असतानाही शासनाने सदर पुस्तकावर बंदी घातली नाही व गिरीष कुबेर याच्यावर गुन्हाही दाखल केला नाही. याचाच अर्थ कुबेरला राज्य सरकार पाठीशी घालून छत्रपतींचा अपमान करीत असल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडचे ठाणे-पालघरचे विभागीय अध्यक्ष डॉ. योगेश पाटील यांनी स्मशानात बसून निषेध म्हणून मुंडन करीत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.