कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेना, मनसे, वंचितचे उमेदवार जाहीर 

कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेना, मनसे, वंचितचे उमेदवार जाहीर 

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आजपर्यंत शिवसेनेने ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, मनसेकडून माजी आमदार प्रकाश भोईर, वंचित बहुजन आघाडीकडून अजय सावंत हे प्रमुख उमेदवार जाहीर झाले आहेत. दुसरीकडे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपली जागा मित्रपक्ष सेनेला सोडल्याने  ‘राजीनामास्त्र’ उगारले आहे.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचे नरेंद्र पवार हे आहेत. मात्र सेना-भाजप युतीच्या जागावाटपात भाजपने ही जागा सेनेला सोडल्याने शिवसेनेने स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी न देता ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांना येथून उमेदवारी जाहीर केली आहे. पाटील हे कल्याणच्या बाहेरील असल्याने पक्षनेतृत्वाने स्थानिक कार्यकर्त्यांना डावलल्याने कल्याण पश्चिमेतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून  तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यांच्याकडून पक्षनेतृत्वाने या उमेदवारीबाबत फेरविचार करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, कल्याण पश्चिम ही विद्यमान आमदार असलेली भाजपची जागा सेनेला सोडल्याने भाजपच्या स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यालयासमोर शक्तीप्रदर्शन केले. पक्षनेतृत्वाने आपल्या ताब्यातील ही जागा सेनेला सोडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे जागरूक नागरिक या नागरी सुविधांविषयी आंदोलने करणाऱ्या संघटनेने संजीथा नायर यांना कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. पूर्व बँक कर्मचारी असलेल्या नायर या जागरूक नागरिक संस्थेच्या माध्यमातून सक्रीय आहेत. राजकारण विरहित प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला आहे. ‘जागरूक नागरिक’च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वानुमते नायर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेचे संयोजक श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले आहे.

संभाजी ब्रिगेड पक्षाने देखील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एका महिला डॉक्टरला उमेदवारी जाहीर केली आहे. टिटवाळा येथील प्रथितयश महिला डॉक्टर नीता पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे ठाणे मध्य जिल्हा अध्यक्ष अमित केरकर यांनी याबाबत माहित देताना सांगितले की, कल्याण पश्चिम मधून डॉ. पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.