पुराची झळ बसलेल्या आश्रम शाळेला शिवसेनेची मदत ! 

पुराची झळ बसलेल्या आश्रम शाळेला शिवसेनेची मदत ! 

वासिंद (प्रतिनिधी) : 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला संततधार झालेल्या पावसामुळे भातसा नदीच्या पात्रातील प्रचंड वाढलेल्या प्रवाहामुळे वासिंद जवळील भातसई येथील गाडगे महाराज आदिवासी अनुदानित या आश्रमशाळेमध्ये पाणी जाऊन तेथील सर्व धान्य, कपडे, वह्या पुस्तके आदी साहित्य-वस्तुंचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ही बाब लक्षात घेत शिवसेनेच्या वतीने संकलित केलेले मदत साहित्य नुकतेच आश्रमशाळेला देण्यात आले.

सदर आश्रम शाळेची अडचण आणि प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना, युवासेना यांच्या वतीने मदतीचा हात म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संकलन केलेले वह्या, रजिस्टर, कंपास पेटी, रंग पेट्या,पेन ,पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्य शिवसेनेचे संपर्क प्रमुख विठ्ठल भेरे, विभाग प्रमुख गुरुनाथ ठाकरे, शहरप्रमुख विकास शेलार, सदस्य दत्ता ठाकरे, शहर सचिव मुकेश दामोदरे आदिंनी भेट देऊन शाळा व्यवस्थापनाकडे सुपूर्द केले.