शिवराज्याभिषेकदिनी रायगडाच्या राजसदरेवर बसण्याचा बहुमान शेतकऱ्याला

शिवराज्याभिषेकदिनी रायगडाच्या राजसदरेवर बसण्याचा बहुमान शेतकऱ्याला

महाड (प्रतिनिधी) :

किल्ले रायगडावर साजरा होत असलेल्या शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती संभाजी राजे यांच्या समवेत राजसदरेवर बसण्याचा बहुमान यंदा एका शेतकऱ्याला मिळणार आहे. 'रयतेचे राजे' ही शिवाजी महाराजांची सर्वमान्य ओळख होती. म्हणूनच यंदा शिवराज्याभिषेकानिमित्त होणाऱ्या अभिषेकाप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात रयतेमधील एका शेतकरी जोडप्याला राजसदरेवर बसण्याचा बहुमान देण्यात येईल अशी माहिती खा. छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. तमाम शेतकरी समाज हा राज्याच्या धोरणाचा केंद्रबिंदू झाला पाहिजे. त्यासाठी सर्वांना एकत्र आणण्याचा माझा मानस आहे. सर्वांनी पक्षभेद, मतभेद विसरून एकदिलाने प्रयत्न केला तर नक्कीच कायमस्वरूपी तोडगा निघेल असा आशावाद देखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

याबाबत अधिक माहिती देताना संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघत आहे. याचा सर्वात मोठा फटका अन्नदात्या रयतेला बसत आहे. राज्यात होत असलेल्या, 'शेतकरी आत्महत्यांच्या' करूण कहाण्या ऐकून माझं मन सुन्न झालं आहे. सर्वांना पोटभर खायला घालणारा शेतकरी  मात्र उपाशी पोटी झोपतो आहे. शेतकऱ्यांना पूर्वी समाजात सन्मान होता. आज तो मिळत नाही. पूर्वी लोक 'शेतकरी राजा' असं सहज संबोधित करत. परंतु हा राजा आज गलितगात्र झाला आहे. शिवाजी महाराजांना 'रयतेचे राजे' म्हणून संबोधले जायचे. त्यामुळे यंदा रयतेच्या राजाच्या राज्याभिषेकाला जवळून पाहण्यासाठी आणि अभिषेकात सहभागी होण्यासाठी रयतेलाच बोलावू. प्रातिनिधिक स्वरूपात एका शेतकरी जोडप्याला राजसदरेवर स्थानापन्न होण्याचा बहुमान दिला जाईल.

संभाजीराजे पुढे म्हणाले की, आमच्या नजरेत शेतकऱ्यांचा मानसन्मान हा सर्वोच्च आहे. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा हेच आवडलं असतं आणि त्यांना नक्की आवडेल हा विश्वास मला वाटतो. माझी अशी श्रद्धा आहे की, गडकोटांच्या माध्यमातून शिवाजी महाराज आजही आपल्या सर्वांमध्ये जीवंत आहेत. रायगडामध्ये तर नक्कीच त्यांचं अस्तित्व जाणवतं. म्हणून महाराजांचा आशीर्वाद सर्व महाराष्ट्रीय शेतकऱ्यांना लाभावा यासाठी हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.