शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शासनातर्फे पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची आढावा बैठक संपन्न 

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शासनातर्फे पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची आढावा बैठक संपन्न 

महाड ( प्रतिनिधी) :

दुर्गराज रायगडवर गुरुवार दि. ६ जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने येणाऱ्या शिवभक्तांना शासनाच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी अंतिम बैठक नुकतीच रायगडावरील हत्तीखान्यात घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्व विभागांच्या तयारीची सविस्तर माहीती संबंधित विभागप्रमुखांनी दिली.

या बैठकीला शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या मार्गदर्शिका युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती, रायगडचे जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,  जिल्हा पोलीस प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध शासकीय पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या अंतर्गत विविध समित्यांचे प्रमुख देखील उपस्थित होते.

सदर सोहोळ्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र परिवहन विभागाच्या वतीने महाड- रायगड या मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार असून, वाहनतळापासून शिवभक्तांना गडाच्या पायथ्यापर्यंत सोडण्यासाठी शटल बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गडाच्या पायथ्याला होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात वाहनतळ तयार करण्यात येणार आहेत. तसेच गडावर ठिकठिकाणी आरोग्यसेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा अधिकारी, विद्युत कर्मचारी, पोलीस अधिकारी हे दि. ५ व ६ जूनला गडावर २४ तास उपलब्ध असणार असल्याची माहिती यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.