शिवतेज मित्र मंडळाची तिकोणा-राजमाची किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम

शिवतेज मित्र मंडळाची तिकोणा-राजमाची किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम

माणगाव (प्रतिनिधी) :
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या मराठा साम्राज्याच्या वैभवाचे चांगल्या प्रकारे संवर्धन व्हावे, गडकिल्ल्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांना स्वछतेचे महत्व कळावे यासाठी नांदवी येथील शिवतेज मित्र मंडळाने तिकोणा आणि राजमाची किल्ल्यांवर नुकतीच दोन दिवसीय ‘गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम राबविली. 

नांदवी येथील शिवतेज मित्र मंडळाच्या यापूर्वी किल्ले रायगड, लोहगड व राजगड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्या होत्या. यावेळी मंडळाच्या वतीने किल्ले तिकोणा आणि किल्ले राजमाची ही ठिकाणीं निवडण्यात आली होती. मंडळाच्या पंचवीस जणांच्या टीमने दोन गटांमध्ये विभागनी करून जबबादारी वाटून घेत दोन दिवस या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविली.

किल्ले राजमाचीला दिलेल्या भेटीदरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांना तिथे प्रशासनाच्या ढिसाळ वृत्तीचे दर्शन झाले. मुळात आज साडेतीनशे वर्षांनेही ह्या ठिकाणी मुलभूत सोयीसुविधा सुद्धा नाहीत किंबहुना प्रशासन त्या  उपलब्ध करून देत नाहीत हे फारच क्लेशदायक असल्याचे दिसून आले. मुंबई-पुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस सुमारे पंधरा कीमी अंतरावर राजमाची किल्ला आहे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहे. त्याकाळी ते लष्करीदृष्ट्या महत्वाचे ठाणे होते. आता तिथे अनेक गैरसोयी निर्माण झालेल्या आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी जी छोटीशीच निमुळती पायवाट असून तेथून प्रवास करताना पर्यटकांवर जिवावर बेतू शकते. या पायवाटेच्या एका बाजूने संरक्षित तार असणे फार गरजेचे आहे. गडावरील पाण्याच्या टाकीच्या शेजारीसुद्धा अतिशय बिकट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तिथेसुद्धा योग्य अशी तटबंदी असणे फार गरजेचे आहे. 

मुख्य म्हणजे ज्या मुलभूत सोयीसुविधा म्हणजेच चांगले रस्ते, शौचालये, पिण्याचे पाणी, निवारा शेडसह आपत्कालीन यंत्रणा इथे उभारणे आवश्यक असल्याचेही शिवतेज मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यांनी स्थानिक वाडीवरील लोकांशी चर्चा केली असता अतिशय विदारक वास्तव त्यांनी सांगितले. निसर्गाचे मुक्तहस्त वैभव लाभलेल्या ऐतिहासिक ह्या गडास सध्या अनेक असुविधांनी ग्रासले आहे. यासंदर्भात येथील समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रव्यवहार करण्याचे सुतोवाच शिवतेज मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.