कल्याण-डोंबिवलीत धुमधडाक्यात शिवजयंती साजरी

कल्याण-डोंबिवलीत धुमधडाक्यात शिवजयंती साजरी

डोंबिवली (प्रतिनिधी) : 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा म्हणजे डोंबिवलीत शिवसैनिकांचा दसरा-दिवाळी सण मानला जातो. संपूर्ण डोंबिवली शहरात शिवसेनेच्या शाखांमधून दिवसभर विविध कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी महाराजांची ढोल-पथकांसह पालखी मिरवणूक आणि शिवकालीन चित्ररथ पूर्वेकडील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडे मार्गक्रमण करतात. पण यावर्षी धोकादायक कोपरपूल बंद केल्यामुळे पश्चिमकडील शिवसैनिकांना पूर्वेकडील मध्यवर्ती कार्यालयाशेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्याच्या पुतळ्यावर मिरवणुकीसह पुष्पवृष्टी करण्यास मिळाली नाही. पूर्व-पश्चिम शिवसैनिकांना आपापल्या विभागातच मिरवणुका काढाव्या लागल्या.

पूर्वेकडील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाशेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यास डोंबिवली शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेश मोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्या शेजारी शेतकऱ्यांच्या समस्या या विषयावर चलचित्र लक्षवेधी ठरले. पूर्वेकडील गांधीनगर येथील शिवसेना शाखेच्या माध्यमातून माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील यांनी उत्सव साजरा केला. सायंकाळी पूर्वकडील शाखांतर्फे मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत छ. शिवाजी महाराज, जिजाऊ, मावळे अशा ऐतिहासिक वेशभूषा करून आणि नाचणारा घोडा पाहण्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. 

पश्चिमेकडील कोपरगाव येथे जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी शिवजयंती उत्सव सोहळा साजरा केला. कोपरगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. संध्याकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखीची कोपरगाव, कोपररोड, सखाराम कॉम्प्लेक्स आदी भागातून मिरवणूक काढण्यात आली. नगरसेवक म्हात्रे यांनी महाराजांच्या शौर्याची माहिती सांगून छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला. विशेष म्हणजे या मिरवणुकीत जागतिक कीर्तीचे सायकलपटू विनोद पुनामिया सहभागी झाले होते.

जुनी डोंबिवली ठाकूरवाडी येथील नगरसेविका संगीता पाटील यांनी शिवजयंती उत्सव, श्री सत्यनारायण महापूजा आणि डबलबारी भजनांचा जंगी सामना आयोजित केला होता. नागरिकांनी डबलबारी भजनाचा आनंद घेतला. तर यावर्षी सायंकाळी पश्चिमेकडून निघणाऱ्या मिरवणूका कोपरपूल बंद असल्याने पूर्वेकडे येऊ शकल्या नाहीत.