शिवराज्याभिषेक शिल्पचित्र प्रकरणी ठामपाचे ‘देर आये दुरुस्त आये’ - रमेश आंब्रे 

शिवराज्याभिषेक शिल्पचित्र प्रकरणी ठामपाचे ‘देर आये दुरुस्त आये’ - रमेश आंब्रे 

ठाणे (प्रतिनिधी) : 
ठाणे महापालिका मुख्यालयाच्या इमारतीवर असलेले शिवराज्याभिषेक शिल्पचित्र नव्याने करण्यात येणार आहे. या संदर्भात प्रथम आवाज उठविणाऱया सकल मराठा समाज ठाणे यांनी स्वागत केले असून `देर आये दुरुस्त आये' अशी खोचक टिकाही केली आहे. 

महाराष्ट्राचे दैवत असलेले जाणता राजा शिवाजी महाराज यांचे शिल्पचित्र ठाणे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालय इमारतीवर आहे. या शिल्पाची दयनिय अवस्था झाल्याने सकल मराठा समाज ठाणे यांनी वारंवार पत्रव्यवहार केला होता. मात्र शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर बसलेल्या शिवसेनेला शिल्पाची दुरुस्ती करण्या संदर्भात कोणतेही सोयरसुतक नव्हते. अखेर सकल मराठा समाज ठाणे संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला होता.

ठाणे महापालिका सत्ताधाऱयांना जमत नसेल तर सकल मराठा समाज ठाणे यांनी शिवप्रेमींकडून निधी संकलन करण्याचा निश्चय केला आणि तो कृतीत उतरविला. या निधीवरुन सत्ताधारी आणि सकल मराठा समाज ठाणे कार्यकर्त्यांमध्ये वादंग निर्माण झाला होता. अखेरीस सकल मराठा समाज ठाणे च्या रेट्यामुळे शिवराज्याभिषेक शिल्पचित्र नव्याने तयार करण्यासंदर्भात सत्ताधारी आणि प्रशासनाला जाग आली आहे. नुकतेच या संदर्भात महापौर आणि आयुक्तांच्या समक्ष शिल्पचित्राचे सादरीकरण नामवंत कलादिग्दर्शकांनी केले आहे. हे शिल्पचित्रे आकर्षक स्वरुपाचे बनवून संपूर्ण ठाणेकरांना अभिमानाची बाब ठरेल असे बनवावे, अशी अपेक्षा सकल मराठा समाज ठाणे शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष रमेश आंब्रे यांनी केली आहे.