जनसामान्यांचे मन जिंकणारा शिवसैनिक 

जनसामान्यांचे मन जिंकणारा शिवसैनिक 

सुशिक्षितांची नगरी म्हणून डोंबिवली शहराची ओळख आहे. या सुशिक्षितांच्या नगरीला राजकारणाची देखील तेवढीच आवड आहे. या शहराने राज्याला तीन-तीन मंत्री दिले आहेत. राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या अशा शहराचे राजकीय नेतृत्व करणे तितकेसे सोपे नक्कीच नाही. एखाद्या राजकीय पक्षाचे या शहरात नेतृत्व करणे हि बाब मोठ्या कसोटीची असते. या कसोटीला पुरेपूर उतरणारे नेतृत्व म्हणून शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांच्याकडे पाहता येईल. १५ सप्टेंबर रोजी मोरे यांचा वाढदिवस त्या निमित्ताने... 

मोरे हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांचे जवळचे अनुयायी. म्हात्रे यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. पुढे म्हात्रे यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मोरे यांनीही सेनेत प्रवेश केला. डोंबिवली पश्चिमेत मोठा गाव ठाकुर्ली येथे राहत असताना त्यांनी महापालिकेची निवडणूक डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर प्रभागातून लढवली व जिंकली देखील- पुढे नगरसेवक पदाची निवडणूक जिंकण्याची हॅटट्रिक देखील त्यांनी केली. ज्यावेळी प्रभाग महिलांसाठी राखीव झाला तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दत्तनगर प्रभागातून पत्नी भारती मोरे यांना उभे केले व स्वत: लगतच्या रघुवीरनगर प्रभागातून निवडणूक लढवली, दोघेही येथून सलग विजयी झाले आहेत. पुढे त्यांनी स्थायी समितीचे सदस्य, सभागृहनेता अशी पदे भूषविली. 

कोणतीही जबाबदारी मिळाली की ती आव्हान म्हणून स्वीकारून तिला न्याय द्यायचा हे मोरे यांच्या वृत्तीतच आहे. शिवसैनिक म्हणून काम करताना त्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. पक्षाने सोपविलेली कोणतीही जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी झपाटून प्रयत्न करण्याच्या त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना प्रथम महापालिकेत सभागृहनेते पद देण्यात आले. आता त्यांच्यावर शहरप्रमुख पदाची जबाबदारी असून ती ते सक्षमपणे सांभाळत आहेत. पक्षाचा कार्यक्रम असो की निवडणुकीची धामधूम अथकपणे काम करण्याचा त्यांचा स्वभाव अनुभवास येतो. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राजेश मोरे यांच्यावर खास विश्वास असल्याचे दिसून येते- आणि आपल्या नेत्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मोरे यांचाही सातत्याने प्रयत्न असतो. 

शहरप्रमुख म्हणून काम करत असतानाही मोरे आपल्या प्रभागातील कामांकडे, नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे ते जातीने लक्ष पुरवितात. प्रभागातील प्रत्येक नागरी समस्या ते बारकाईने लक्ष पुरवून संबधित अधिकाऱ्यांकडून सोडवून घेतात. लोकांचे मन जिंकून घेण्याची कला त्यांना चांगलीच अवगत आहे. त्यामुळेच साध्या कार्यकर्त्यापासून ते प्रतिष्ठित आसामीपर्यंत ते सर्वांशी मैत्रीचे नाते जपतात. प्रभागातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे जातीने लक्ष पुरवून त्यांना प्रसंगानुरूप मदत करण्याकडे राजेश मोरे यांचा कल असतो. त्यांचे प्रभाग हे कॉस्मोपॉलिटिन स्वरूपाचे असल्याने विविध प्रांतातील नागरिक त्यांचे मतदार आहेत या सर्वांकडे एकसमान दृष्टीने ते पाहतात. त्यामुळेच त्यांच्याकडे येणारा प्रत्येकजण समाधानी होऊनच परत जातो.

कोरोना महामारीच्या काळात देखील राजेश मोरे यांनी आपल्या प्रभागातील गरजू कुटुंबांना हरतऱ्हेची मदत केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहरातही शिवसेनेच्या माध्यमातून मदतकार्य राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. आताच्या अतिवृष्टीने कोकणाला तडाखा दिला असताना श्रीकांत शिंदे यांच्या सोबतीने डोंबिवली शहरातून शिवसेनेच्या वतीने मोठी मदत रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचविण्यात मोरे यांनी सहकारी शिवसैनिकांच्या साथीने पुढाकार घेतला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाची दृष्टी असणारा शिवसैनिक म्हणूनच राजेश मोरे यांचे नाव घ्यावे लागेल!
----

लेखक : विराज खैर, टिटवाळा.