बल्याणी येथील शिवसेना शाखेचे आ. विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन

बल्याणी येथील शिवसेना शाखेचे आ. विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन

कल्याण (प्रतिनिधी) : प्रभाग क्र. ११, बल्याणी येथील मध्यवर्ती शिवसेना शाखेचे आमदार भोईर यांच्या हस्ते सोमवारी मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील, नगरसेविका नमिता मयूर पाटील यांच्या पुढाकाराने या मध्यवर्ती शाखेचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार भोईर यांनी उपस्थितांना संबोधित करताना, शाखेतून गोरगरीब जनतेची सेवा घडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. 

यावेळी बोलताना आमदार भोईर म्हणाले की, परिसरातील लोकसंख्या वाढत असून त्याच प्रमाणात नागरी समस्या, जनतेचे प्रश्न देखील वाढत आहेत. ते सोडविण्यासाठी या शाखेचा निश्‍चितपणे उपयोग होईल. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे कामाचे सूत्र असून त्यानुसार येथून कामे होतील, असे त्यांनी सांगितले. स्थानिक नगरसेविका नमिता मयूर पाटील यांचे प्रभागात उत्तम काम सुरु असून त्यामुळे येथून पुन्हा एकदा  शिवसेनाच निवडून येईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या संकटात परिसरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले काम प्रत्येक नागरिकाने जवळून पाहिलेले आहे. शिवसेनेचेच कार्यकर्ते हे काम करू शकतात हे अभिमानाने आ. भोईर यांनी सांगितले. 

सदर प्रसंगी उपशहरप्रमुख विजय काटकर, उपशहरप्रमुख किशोर शुक्ला, नगरसेवक महेश गायकवाड, गणेश कोट, जयवंत भोईर, महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया पोटे, सुनील वायले, रवींद्र कपोते, अनिल गोवळकर, सुरेश सोनार आदींसह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.