कल्याण-डोंबिवलीकरांना कर न भरण्याचे सेना नगरसेवकाचे आवाहन

कल्याण-डोंबिवलीकरांना कर न भरण्याचे सेना नगरसेवकाचे आवाहन

कल्याण (प्रतिनिधी) : 
गत १० वर्षात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विकासकांना दोन वेळा मालमत्ता करात सवलत देण्यात आली. तरीही १८५३ विकासकाकडे ७०० कोटी रुपयाची थकबाकी आहे. मात्र या थकबाकीदारांची महापालिकेकडून पाठराखण केली जात आहे. त्यामुळे जोपर्यत या बड्या विकासकांकडून थकबाकीची वसुली केली जात नाही तोपर्यत सामान्य नागरिकांनी कर भरू नये, अशी भूमिका बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य वामन म्हात्रे यांनी व्यक्त केली. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरकार स्थापन झाल्यानंतर आपण जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा देत म्हात्रे यांनी स्वपक्षीय शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.

महापालिका क्षेत्रातील सुमारे १ लाख मालमत्तांना अद्यापि कर आकारणी करण्यात आलेली नसल्याने महापालिकेला सुमारे ७० कोटी रुपयाच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. या मालमत्ताधारकांकडून महापालिकेच्या सोयी सुविधा फुकटात वापरल्या जात आहेत. दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडून केवळ १ लाख ४० हजार मालमत्तांना कर आकारणी केली जात असून नव्या मालमत्ता शोधण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या ठेकेदाराने देखील कोणत्याही नव्या मालमत्ता न शोधताच १० कोटी रुपये प्रशासनाकडून उधळल्याचा आरोप  म्हात्रे यांनी केला आहे.

मोठ्या विकासकाकडून कर भरण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्यांच्याकडील थकबाकी वाढत चालली आहे. मात्र त्यांच्यावर ठोस कारवाई न करता थातूरमातुर कारवाई केली जात असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. सामान्य नागरिकांचा थोडाही कर चुकला तरीही त्यांच्यामागे वसुलीसाठी तगादा लावला जातो. या प्रकाराचा निषेध म्हणून जोपर्यत विकासकांकडून थकबाकीची वसुली होत नाही, तोपर्यत गरीब करदात्यांनी कराचा भरणा करू नये यासाठी आपण जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा म्हात्रे यांनी बुधवारच्या बैठकीत दिला. त्यांच्या या पवित्र्याने त्यांनी स्वपक्षीय सत्ताधारी शिवसेनेलाच त्यांनी घरचा आहेर दिला आहे. महापालिका प्रशासनाच्या विकासकधार्जिण्या कार्यपद्धतीची राज्य शासन, लोकायुक्त व लाचलुचपत विभाग यांच्याकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेत वामन म्हात्रे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

दरम्यान, मालमत्ता कर वसुलीसंदर्भात बुधवारी स्थायी समितीच्या दालनात घेण्यात आलेल्या बैठकीला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने त्याला आक्षेप घेत विकासकांना अभय देण्यासाठीच या गुप्त बैठकीचे आयोजन केले गेल्याचा गंभीर आरोप म्हात्रे यांनी यावेळी केला.