कल्याणमधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे मदतीचा हात

कल्याणमधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे मदतीचा हात

कल्याण (प्रतिनिधी) : जुलै महिन्यात कल्याण शहराला  पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. सतत कोसळणाऱ्या धुवांधार पावसाने कल्याण पश्चिमेतील मांडा-टिटवाळा, अटाळी, वडवली, घोलपनगर, भवानी चौक, गोविंदवाडी, रेतीबंदर येथील भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने तेथील कुटुंबांचे अन्नधान्याचे नुकसान झाले. या पूरग्रस्त कुटुंबांना रविवारी शिवसेनेचे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने अन्नधान्य तसेच  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार तथा शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी मांडा-टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर चाळ परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात आले. मांडा-टिटवाळा येथील सुमारे २५०, घोलपनगर, भवानी चौक येथील ४५० कुटुंबांना शहर शाखेच्या  वतीने तर अटाळी-वडवली येथील ४५० पूरग्रस्त कुटुंबांना आमदार भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या वतीने मदतीचे वाटप करण्यात आले. 

मुसळधार पावसाने अनेकांचे खूप नुकसान झाले असून शासनाच्या वतीने त्याचे पंचनामे सुरू आहेत. अनेकांचे पंचनामे पूर्ण झाले असून काही थोडेच बाकी राहिले आहेत. त्यामुळे शासनाची जी काही मदत असेल ती पूरग्रस्तांना मिळेलच परंतू शिवसेना हा समाजाभिमुख पक्ष आल्याने आमचे ही काही कर्तव्य आहे याचं भावनेने थेट पूरग्रस्तांना मदत मिळावी याच हेतूने ही मदत नव्हे तर कर्तव्य केल्याची भावना यावेळी बोलताना व्यक्त केली. तसेच रेतीबंदर आणि गोविंदवाडी परिसरातील सुमारे २५० पूरग्रस्तांनाही शहर शाखेच्या वतीने मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आमदार भोईर यांनी यावेळी दिली.