शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईसाठी शिवसेनेचा मोर्चा

शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईसाठी शिवसेनेचा मोर्चा

कल्याण (प्रतिनिधी) : 
ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी कल्याणात शिवसेनेने मोर्चा काढला होता. कल्याण तहसिल कार्यालयावर नेण्यात आलेल्या या मोर्चामध्ये कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अवकाळी पावसामूळे कल्याण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून त्यांना अद्यापही मदत न मिळाल्याचे सांगत शिवसेनेतर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि बागायतदारांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी शिवसनेतर्फे करण्यात आली.

शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे, माजी नगरसेवक रवि पाटील, अल्ताफ शेख, संजय पाटील, तात्यासाहेब माने, शरद पाटील, महिला आघाडीच्या छाया वाघमारे, कविता गावंड, अस्मिता माने आदी पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसिलदार दिपक आकडे यांची भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन साद केले.