कल्याणच्या शिवसेनेला दोन शहर प्रमुखांची प्रतीक्षा

कल्याणच्या शिवसेनेला दोन शहर प्रमुखांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : गत विधानसभा निवडणुकीत कल्याण शहराचे शिवसेनेचे विद्यमान शहरप्रमुख विश्वनाथ भोईर हे आमदार म्हणून निवडून आल्याने पक्षाला नविन शहरप्रमुख मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र कोरोनाचा प्रदुभाव वाढल्याने शहरप्रमुखपदाच्या नियुक्तीची चर्चा मागे पडली. असे असले तरी कल्याणला यापुढे दोन शहरप्रमुख मिळणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात चर्चिली जात आहे.

शासन स्तरावर कल्याण व आजूबाजूचे काही तालुके मिळून नविन कल्याण जिल्हा करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरु आहे. लोकसभा मतदारसंघानुसार नविन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे सूत्र देखील मांडले जात आहे. याचा विचार करता कल्याण तालुक्यात कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण व डोंबिवली शहर असे चार विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण व डोंबिवली हे विधानसभा मतदारसंघ आणि उल्हासनगर, अंबरनाथ व मुंब्रा-कळवा हे विधानसभा मिळून कल्याण लोकसभा मतदारसंघ बनला आहे. तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघात गेला आहे. तेथे भाजपचे खासदार निवडून आले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणून आलेले शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कार्यतत्पर शैलीने मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला आहे. ते जातीने सर्व कामांमध्ये लक्ष पुरवत असल्याने येथे विविध कामे गतीने मार्गी लागतात. त्या तुलनेत भिवंडी लोकसभेत येणाऱ्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाला सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. येथील शहरप्रमुख भोईर हेच आमदार म्हणून निवडून आल्याने त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. शहरप्रमुख पदाचे पक्षातील महत्व पाहता ही जबाबदारी आता अन्य खंद्या शिवसैनिकाकडे सोपवली जाणे गरजेचे असल्याचे, मत व्यक्त केले जात आहे.

कल्याण शहर प्रमुख पदासाठी इच्छुकांमध्ये सचिन बासरे रविंद्र पाटील, सुनील वायले, बाळा परब यांची नावे चर्चेत आहेत. त्याचप्रमाणे कल्याण शहराचा वाढता विस्तार आणि विकास पाहता कल्याणला यापुढे दोन शहरप्रमुख मिळणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळातच चर्चिली जात आहे. तसे झाल्यास कल्याण पूर्व आणि पश्चिम अशी दोन शहरप्रमुख पदांची निर्मिती होणे शक्य आहे. तसे झाल्यास कल्याण पूर्व भागासाठी पूर्वेतील ज्येष्ठ शिवसैनिक शरद पाटील, नगरसेवक महेश गायकवाड, उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे या व अन्य पदाधिकाऱ्यांचा विचार केला जाऊ शकतो. सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतर नविन शहरप्रमुख नियुक्तीचा पक्षनेतृत्वाकडून विचार केला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.

यासंदर्भात कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता कल्याण पूर्व आणि पश्चिम शहर प्रमुख पदाचा प्रस्ताव तसा जुनाच असून वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा होईल त्यावेळेस निर्णय घेतला जाईल. कल्याण शहर प्रमुख यांची नेमणूकी संदर्भात सध्या काही ठरले नसून आत्ताच्या कोरोना परिस्थितीवर विचार करणे शक्य नसल्याचे सांगितले असून पदासाठी कोणाला घाई झाली असेल तर ते चुकीचे असल्याचे गोपाळ लांडगे यांनी सांगितले.