डोंबिवलीकरांच्या महत्वाच्या समस्यांसाठी शिवसेना शहरप्रमुखाचे राज्य शासनांला साकडे 

डोंबिवलीकरांच्या महत्वाच्या समस्यांसाठी शिवसेना शहरप्रमुखाचे राज्य शासनांला साकडे 

कल्याण (प्रतिनिधी) :
डोंबिवली एमआयडीसीतील प्रोबेस कंपनीच्या स्फोटातील मृत-जखमींना नुकसानभरपाई देणे, शहरातील वाढते प्रदूषण रोखणे, कोपर ब्रीजच्या कामाला गती देणे, ठाकुर्ली येथे नवीन उड्डाणपूल बांधणे यासह कल्याण डोंबिवलीतील महापालिका रुग्णालये राज्य शासनाच्या माध्यमातून सुसज्ज करावीत आदी मागण्या शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी नुकतीच गृहमंत्री तथा पर्यावरण मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केल्या आहेत.

राज्याचे गृहमंत्री तथा पर्यावरणमंत्री एकनाथ शिंदे यांची शहरप्रमुख मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नुकतीच भेट घेतली. डोंबिवलीकरांना भेडसावणाऱ्या महत्वाच्या समस्यांबाबत यावेळी त्यांनी निवेदने दिली. यावेळी त्याच्या समवेत शिवसेनेचे शहर कार्यालयप्रमुख सतीश मोडक, सुरेंद्र कुमार कनोजीया आदी उपस्थित होते. डोंबिवली एमआयडीसी विभागात २६ मे २०१६ रोजी प्रोबेस एन्टरप्राईजेस कंपनीत स्फोट  होऊन १२ जण मरण पावले होते तर २१५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ताचे नुकसान झाले. त्याचा अहवाल अद्याप तयार करण्यात आलेला नसून तो त्वरित तयार करून सबंधित बाधितांना तातडीने नुकसान भरपाई देण्याकडे याप्रसंगी लक्ष वेधण्यात आले.

डोंबिवली शहरात गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे. एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यांमध्ये होत असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण नसल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडून नये यासाठी येथील वाढत्या प्रदूषणाची गंभीरतेने दखल घेत शासनाने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.

डोंबिवली शहराच्या पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या कोपर ब्रीजचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. परिणामी विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने या ब्रीजचे काम त्वरेने पूर्ण करण्याबाबत सबंधित विभागाला सूचना देण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने ९० फुटी रस्ता चोळे गाव ते ठाकुर्ली पॉवर हाउस असा नवीन उड्डाणपुल लवकर बांधण्यासंबंधी प्रयत्न करण्याची देखील मागणी केली आहे.

डोंबिवली पश्चिममधील शास्त्रीनगर रुग्णालय आणि कल्याणमधील रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये अनेक सोयीसुविधांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. परिणामी तेथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत असून रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीती आहे. याची दखल घेत राज्य शासनाने ही दोन्ही रुग्णालये आपल्या ताब्यात घेवून ती अद्यावत करून डोंबिवली-कल्याणकर नागरिकांना देण्याची आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.