धक्कादायक! पालीच्या सरसगडाची सरकार दप्तरी नोंदच नाही!

धक्कादायक! पालीच्या सरसगडाची सरकार दप्तरी नोंदच नाही!

पाली (परेश शिंदे) :
सुधागड तालुका म्हटले की सुधागड किल्ला, अष्टविनायकापैकी पालीचा बल्लाळेश्वर, उन्हेरे कुंड, ठानाळेच्या बौध्द लेणी, पाली शहर आणि त्यानंतर आठवणीत राहील तर किल्ले सरसगड. अनेक ऐतिहासिक-पौराणिक घटनांचा साक्षीदार असलेल्या येथील किल्ले सरसगडाकडे आज नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे, तर प्रशासनाकडूनही त्याची अक्षम्य उपेक्षा केली जात आहे. धक्कादायक म्हणजे या गडाची सरकार दफ्तरी किल्ला म्हणून नोंद नसल्याने, या प्रकाराबद्दल आता दुर्गप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सरसगडाविषयी अनेक आख्यायिका पालिकर पूर्वीपासून ऐकत आले आहेत. काहींच्या मते हा दुर्ग पांडवानी बांधला. या गडाचा खडा काळाकभिन्न पहाडासारखा दिसणारा पुढचा भाग म्हणजे भीम, मग धर्मराज, अर्जुन आणि मग जुळे नकुल आणि सहदेव असे सांगितले जाते. सुधागडाच्या सावलीत वाढल्यामुळे काहीसे खुजेपण त्याच्यात नैसर्गिकपणे आले असावे. स्वराज्याच्या राजधानीसाठी सुधागडाचा विचार देखील शिवाजी महाराजांनी केल्याचे बोलले जाते. मात्र तो मान सुधागडाला मिळाला नाही. याच पट्टयातील सरसगड हा टेहळणीसाठी महत्वाचा मानला जात असे.

सरसगडाच्या कुशीत बल्लाळने पूजा करून देवत्व प्राप्त केले होते. एका बाजूला आंब नदी आणि एकीकडे सरसगड यांच्या कुशीत पाली गाव वसले आहे. सरसगडाने इतिहासाचे सुवर्णक्षण तसेच स्वराज्याचा उतरता काळ देखील पाहिला आहे. सरसगडाच्या पायथ्याशी असलेल्या आवंढी गावात स्वराज्याच्या फितुरांना संभाजी राजानी हत्तीच्या पायाखाली दिले होते. अशा अनेक ऐतिहासिक-पौराणिक घटनांचा सरसगड साक्षीदार आहे.
 
उन्हाळ्यात पाली शहरात उष्मा वाढला की गडाचे कातळ तापल्याने जास्त गरम होत असल्याच्या चर्चा होतात. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे होत असलेल्या वातावरणबदलाचे खापर सरसगडावर फोडले जाते. गडाच्या पायथ्याशी अनेक अनधिकृत बांधकामे झाली असून प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गडाच्या पायथ्याशी झालेले या अनधिकृत बांधकामामुळे भूस्खलनाची भिती व्यक्त होत आहे. पाली गावची शाळा म्हणजे ग. बा. वडेर हायस्कुल अगदी सरसगडाच्या कवेत, निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. शाळेचे माजी प्राचार्य लिमये सरानी आणि शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी गडाच्या परिसरात हजारो झाडे लावली आणि जगवली देखील. त्याचे सुखद परिणाम आज पालीकर उपभोगत आहेत. पूर्वी शाळेतील विद्यार्थ्याची सरसगड शर्यत व्हायची ती देखील कालांतराने बंद झाली. शर्यतीच्या निमित्ताने विद्यार्थी सरसगडाची सैर करून यायचे आता तसे काही होत नाही.

धक्कादायक बाब म्हणजे महसूल दप्तरी या सरसगडाची नोंद किल्ला म्हणून नाही. महसूल दप्तरी डोंगर म्हणून त्याची नोंद आहे. गडाचा सातबारा उतारा सध्या वनविभागाच्या नावे आहे. त्यामुळे सरसगड किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी आतापर्यंत निधी आल्याचे ऐकिवात नाही. यावरून सरसगडाची पुरातत्व विभागाकडून उपेक्षा होत असल्याचे समोर येत आहे. लवकरात सरसगडाची सरकार दरबारी नोंद व्हावी आणि त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुरेशा निधीची तरतूद व्हावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.