शिक्षणापासून वंचित बालकांपर्यंत स्वातंत्र्याची किरणे पोहोचावीत- विवेक पंडित

शिक्षणापासून वंचित बालकांपर्यंत स्वातंत्र्याची किरणे पोहोचावीत- विवेक पंडित

ऊसगाव डोंगरी (प्रतिनिधी)  :
भारत देशाच्या स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होताना अजूनही समाजातील काही घटक वंचित राहत असतील. देशात १०० पैकी ५० मुले भुकेने मरत असतील तर आपला देश स्वतंत्र कसा असू शकतो, असा  मूलभूत सवाल श्रमजीवी संघटनेचे संस्थापक नेते तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी येथे केला. नाबार्ड स्थानीय लोकाधिकार समिती मुंबई यांचेकडून विधायक संसद संचालित एकलव्य परिवर्तन विद्यालयातील मुलींसाठी समितीच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या धान्य व किराणा सामानाचे वाटप कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

आपल्या भाषणात पुढे बोलताना त्यांनी, वंचितांच्या न्याय्य हक्क आणि सन्मानासाठी कार्य करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, कृतीची जोड नसल्याने संत ज्ञानेश्वरांनी ७०० वर्षांपूर्वी लिहिलेले पसायदान अद्याप अमलात येऊ शकलेले नाही. समाजातील विषमता आहे तशीच आहे. एकलव्य हा सामाजिक अन्यायाचा बळी असलेले प्रतिक होता. जाती व्यवस्थेमुळेच त्याला शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला. कर्णालाही सूत पुत्र म्हणून हिनवले गेले. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय संविधानातील विचार, स्वातंत्र्यवीरांचे स्वप्न प्रत्यक्ष  आणण्यासाठी त्याला आपल्या स्वतःच्या कृतीची जोड दिली पाहिजे.  
                         
यावेळी संस्थेच्या संस्थापिका व सचिव विद्युल्लताताई पंडित, नाबार्ड स्थानीय लोकाधिकार समितीचे बांद्रा युनिटचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सकपाळ, नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक सुधीर कुमार जन्नावार, उपमहाप्रबंधक अनिल कोतमिरे, उपमहाप्रबंधक राजभाषा विभाग सच्चीदानंद, पी. मंजुळा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सहसंचालक किसन चौरे यांनी केले.