...तर प्रत्येक मतदारसंघात १०० उमेदवार द्या - धनंजय जोगदंड

...तर प्रत्येक मतदारसंघात १०० उमेदवार द्या - धनंजय जोगदंड

कल्याण (प्रतिनिधी) : 
राज्यातील येत्या विधानसभा निवडणूकीसह सर्वच निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या पाहिजे. यापुढे ‘इव्हीएमवर निवडणुका घेऊ नयेत असा सर्वपक्षीय ठराव सर्वानुमते नुकताच कल्याण येथे करण्यात आला. ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलनाच्या वतीने येत्या ९ ऑगस्ट रोजी देशभर ईव्हीएम विरोधी आंदोलन होत आहे. या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी कल्याण पूर्व येथील कशीश इंटरनॅशनलमध्ये आयोजित बॅन ईव्हीएम परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंचावर ईव्हीएम विरोधी आंदोलनाचे राष्ट्रीय निमंत्रक रवि भिलाणे, फिरोज मिठीबोरवाला, कॉंग्रेस नेते संतोष केणे, शैलेश तिवारी, मनसेचे संजय राठोड, माजी नगरसेवक अनंता गायकवाड़, ज्योती बडेकर, स्वा. रिपब्लिकनचे लक्ष्मण अंभोरे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रसन्ना अचलकर, सामजिक कार्यकर्ते मुकेश झा, वंदना लोखंडे मंचावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वच पक्ष-संघटनांच्या नेत्यांनी ९ ऑगस्टच्या लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येने सामील होऊन हा मार्च यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. 

याप्रसंगी फ़िरोज मिठीबोरवाला यांनी ईव्हीएमबाबत सखोल माहिती दिली. त्यात होणारी गडबड, तसेच निवडणूक आयोग कसा सरकारच्या हातचे बाहुले झाला आहे याविषयी मत मांडले. तर मुख्य निमंत्रक रवि भिलाणे यांनी जनतेने न घाबरता या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर सर्वपक्षीय नेत्यांसोबत दिल्लीतल्या बैठकीचा तपशिल त्यांनी देत. अनेक धक्कादायक माहिती लोकांसमोर मांडली. 

यावेळी आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी आपले मत व्यक्त करताना आपने मागील दिल्ली विधानसभा मध्ये ईव्हीएम कसे हॅक होते याचे प्रात्यक्षिक दाखविल्याची माहिती त्यांनी दिली. सय्यद शुजाने ईव्हीएमबाबत केलेल्या खळबळजनक दाव्याचा संदर्भ देतानाच जोगदंड यांनी आज ईव्हीएम विरोधात राजकीय पक्ष बोलत नाहीत. कारण राजकीय नेत्यांना घाबरवले जात असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाने आपली मागणी गांभीर्याने घेतली नाही तर आपल्याला विचार करावा लागेल. सर्व राजकीय पक्षांनी ठरवून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत शंभरपेक्षा अधिक उमेदवार उभे करावेत. लोकशाही वाचविण्यासाठी अशाप्रकारची स्ट्रेटजी आपल्याला ठरवावी लागेल असा विचारही अॅड. जोगदंड यांनी मांडला. सीपीआयचे काळू कोमस्कर आपले मत व्यक्त करताना निर्ढावलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन फोडावे लागतील, असे म्हणाले. 

प्रारंभी वर्षा कळके यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक व सुत्रसंचलन उदय रसाळ यांनी केले. या परिषदेला ठाणे विभागातील शेकडो कार्यकर्ते-पदाधिकारी संततधार पडणारा पाऊस व लोकल गाड्या बंद असतानाही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.