...तर फीसाठी तगादा लावणाऱ्या शाळांविरोधात मनसे स्टाईल आंदोलन

...तर फीसाठी तगादा लावणाऱ्या शाळांविरोधात मनसे स्टाईल आंदोलन

ठाणे (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या निर्देशासाचे उल्लंघन करून पालकांना शाळेच्या वतीने फी भरण्यासाठी तगादा लावण्यात येत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली असून पालकांना फी साठी त्रास देणाऱ्या शाळांवर कारवाई करावी यासाठी  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

गेली कित्येक दिवस महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाकडे वेगवेगळ्या माध्यमातून शाळांच्या फीवाढी व फी साठी तगादा लावण्यात येत असल्याच्या   अनेक तक्रारी येत होत्या त्या तक्रारी लक्षात घेऊन मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या आदेशानुसार, मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे शहर अध्यक्ष अरुण घोसाळकर यांनी ठाणे महानगर शिक्षण अधिकारी राजेश कंकाल व प्राथमिक व जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी माध्यमिक श्री बडे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले आणि शासनाचे स्पष्ट निर्देश असताना ज्या शाळा अश्या पद्धतीने पालक आणि विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी व फी वाढीसाठी जबरदस्ती करत आहेत अशा शाळांविरोधात कडक  कारवाई करत त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी प्रितेश मोरे, जितेश रायकर आणि सागर कदम हे पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाचे संकटामुळे कामधंदा बंद असल्याने नागरिकांना शाळेच्या  फी भरणे कठीण होऊन बसले आहे याबाबत सरकारने  निर्देश देऊनसुद्धा काही शाळा नागरिकांना फी भरण्यासाठी तगादा लावत आहे ही बाब निंदनीय आहे. शाळांनी जर नागरिकांना फीसाठी  त्रास दिला तर मनसे स्टाईल आंदोलन करू, असा इशारा मनविसेचे ठाणे शहर अध्यक्ष अरुण घोसाळकर यांनी दिला आहे.