...तर आपण अरब देशांना पाणी निर्यात करू शकतो

...तर आपण अरब देशांना पाणी निर्यात करू शकतो

कल्याण (प्रतिनिधी) :
आपल्याकडे पडणाऱ्या पावसाचे पाणी योग्यरित्या साठवणूक करता आली तर आपण अरब देशांना देखील पाणी निर्यात करू शकू असे प्रतिपादन पर्यावरण तज्ञ मनोज वैद्य यांनी कल्याण जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्थापना दिनानिमित्त कल्याण पश्चिमेतील मोरया सभागृहात आज (सोमवार) आयोजित केलेल्या पाणी परिषदेत बोलताना व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण तज्ञ व विचारवंत डॉ. गिरीश लटके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते व रमेश साळवे हे उपस्थित होते. वैद्य आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, लातूरमध्ये जेवढा पाऊस पडतो त्यापेक्षा अर्धा पाऊस इस्त्राईलमध्ये पडतो. असे असतानाही तिकडे हिरवेगार आहे. इस्त्राईली लोक पाण्याचा अपव्यय होऊ देत नाहीत. पाणी कमी असल्याने त्यांना पाण्याच्या महत्वाची जाणीव आहे. त्याच्या विपरीत आपल्याकडे परस्थिती आहे. महापालिका क्षेत्रात प्रत्येक चौकात महापालिकेच्या पाणी विभागासह अन्य विभागांचे दूरध्वनी क्रमांक लावणे आवश्यक आहे. जेणेकरून कोठे पाण्याची गळती होत असेल तर नागरिक त्या दूरध्वनीवर संपर्क साधून त्याची माहिती देऊ शकतील जेणेकरून पाण्याचा अपव्यय टाळला जाईल अशी सूचना त्यांनी केली.

महाराष्ट्रात खूप धरणे आहेत. मात्र केवळ धरणांनी प्रश्न सुटणार नाही. प्रत्येक गावात पाणी अडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम गांभीर्याने राबविणे गरजेचे आहे. गावांमध्ये जशी देवराई असते तशी गाव तळ्यांची गावराई अशी संकल्पना राबविली पाहिजे असेही मत वैद्य यांनी व्यक्त केले. आजकाल नद्यांमध्ये आढळून येणारी जलपर्णी या नव्याच समस्येला आज तोंड द्यावे लागत आहे. मुलत: ही वनस्पती भारतातील नाही. ती आपल्याकडे कुठून आली कळत नाही. राज्यातील बहुतांशी नद्यांमध्ये जलपर्णी आढळून येत आहे. जलपर्णीमुळे मासे मरतात, मात्र तिचा पाण्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले. पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासंदर्भात बोलताना त्यांनी आपल्याकडे हि संकल्पना अजून रूळलेली नाही. ती सिंगापूरमध्ये यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. लटके यांनीही पाण्याबाबत उद्बोधक विवेचन केले. पाणी परिषदेपूर्वी शहरातून जल दिंडी काढण्यात आली.